तीन-चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन : कारवाई झाल्यास फटका बसण्याची शक्यता
बेळगाव : नवरात्रोत्सव मंडळांना साऊंड सिस्टीम लावण्यासाठी चलन घेणे सक्तीचे आहे. परंतु, मागील तीन ते चार दिवसांपासून बेळगाव वन, ग्राम वनमधील सर्व्हर डाऊनमुळे चलन मिळत नसल्याने नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हेलपाटे मारत आहेत. रितसर परवानगी घेण्यासाठी गेलेल्या मंडळांना सर्व्हर डाऊनचा फटका बसत असल्याने पोलिसांकडून कारवाई झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे. बेळगाव शहरात मागील काही वर्षांमध्ये नवरात्रोत्सव मंडळांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच शहरात दुर्गामूर्तींचे आगमन, पूजन आणि विसर्जन सोहळा पार पडत आहे. त्यामुळे साऊंड सिस्टीमची परवानगी घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. साऊंंड सिस्टीमच्या परवानगीसाठी पोलिसांना चलन भरलेली पावती देणे गरजेचे असते. परंतु, चलन भरण्यासाठी बेळगाव वन, ग्राम वन कार्यालयांमध्ये सर्व्हर डाऊन असल्याने कार्यकर्त्यांना निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने कार्यकर्ते कार्यालयांच्या चकरा मारत आहेत. पोलीस ज्या ज्या वेळी मंडळांना भेटी देतात, त्यावेळी साऊंड सिस्टीमची परवानगी घेतली आहे का? याची तपासणी करतात. अन्यथा मंडळांवर दंडात्मक तसेच साऊंड सिस्टीम जप्त करणे अशा कारवाया केल्या जातात. रितसर परवानगी मागण्यास जाऊनदेखील सर्व्हर डाऊनमुळे समस्या येत असल्याने मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी वैतागत आहेत. या दरम्यान पोलिसांनी कारवाई केल्यास दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर आहे.
सर्व्हर डाऊनमुळे पर्यायी व्यवस्थेची मागणी…
साऊंड सिस्टीमसाठी 50 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत ऑनलाईन चलन काढावे लागते. अध्यक्ष अथवा एखाद्या पदाधिकाऱ्याच्या नावे चलन काढून दिले जाते. ते चलन पोलीस स्थानकात जमा करून लेखी अर्ज दिल्यानंतरच पोलिसांकडून साऊंड सिस्टीमची परवानगी दिली जात आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन असेल तर पर्यायी व्यवस्थेची मागणी नवरात्रोत्सव मंडळांकडून केली जात आहे.









