सीमोल्लंघन सोहळ्यावेळी भव्य मिरवणुकीला सहकार्य करण्याचे आवाहन
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाने बुधवारी मनपा आयुक्त शुभा बी. यांची भेट घेतली. विजया दशमीदिवशी होणाऱ्या सीमोल्लंघन सोहळ्यावेळी शिस्तबद्ध व भव्य मिरवणुकीला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांच्याकडे करण्यात आले. त्याचबरोबर महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आमदार आसिफ सेठ यांनाही पत्र देण्यात आले. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर सीमोल्लंघनाचा सोहळा होतो. म्हैसूरनंतर सर्वात मोठा दसरा बेळगावमध्ये होत असतो. या सोहळ्याच्या नियोजनासाठी महामंडळाने नियोजन केले असून, याला महानगरपालिकेनेही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, अध्यक्ष आनंद आपटेकर, मालोजी अष्टेकर, अंकुश केसरकर, मल्लेश चौगुले, परशुराम किल्लेकर, श्रीनाथ पवार, मुरगेंद्र अंगडी, गौतम पाटील, सुनील बोकडे, आनंद पाटील यांच्यासह इतर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









