विविध गावांतील मंदिरांमध्ये घटस्थापना : भजन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम
वार्ताहर /किणये
तालुक्मयात नवरात्रोत्सवाला सोमवारपासून मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. अनेक गावांतील विविध मंदिरांमध्ये सोमवारी विधिवत पूजा- अर्चा करून घटस्थापना करण्यात आली. मंदिरांमध्ये भजन, प्रवचन व कीर्तन आदी कार्यक्रम सुरू आहेत.
नवरात्रोत्सवानिमित्त बहुतांश गावांतील ग्रामदेवता, कुलदेवता मंदिरांमध्ये आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईही केली आहे. नऊ दिवस मंदिरांमध्ये दीप प्रज्वलित करण्यात येत असून सोमवारपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे.
अनेक गावांमध्ये पारायण सोहळय़ाचे आयोजनही करण्यात आले आहे. पहाटे काकड आरती, त्यानंतर ग्रंथवाचन, दिवसभर भजन व प्रवचनाचे कार्यक्रम, सायंकाळी हरिपाठ कार्यक्रम होत आहेत.
काही गावांमध्ये दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तरुण कार्यकर्त्यांच्यावतीने विविध आध्यात्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बेळगुंदी येथील कलमेश्वर गल्लीतील अंकुर नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने सोमवारी सायंकाळी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र पाटील होते. मूर्तीपूजन शंकर बेटगेरकर, नामदेव गुरव व अरुण गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व विविध देवदेवतांच्या फोटोंचे पूजन करण्यात आले. रोज रात्री 8 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात येत आहे.
बहाद्दरवाडी ब्रह्मलिंग मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम
बहाद्दरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात महाआरती करण्यात आली.
मंगळवारी पहाटे काकड आरती, त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. सायंकाळी हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम झाला. नऊ दिवस मंदिरात कार्यक्रम होणार आहेत. गावातील मान्यवरांच्या हस्ते रोज पूजा करण्यात येत आहे.









