Kolhapur : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील शेतकरी संघ इमारतीच्या पहिल्या मजल्याचा ताबा रविवारी सकाळी घेतला.सुशांत बनसोडे सचिव देवस्थान तथा प्रांत अधिकारी राधानगरी,करवीर चे तहसीलदार स्वप्निल रावडे,करवीरचे मंडल अधिकारी संतोष पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात जागेचा ताबा घेतला.जागेचा ताबा घेतल्यानंतर तत्काळ प्रशासनाकडून जागेच्या साफसफाईचे कामही सुरू करण्यात आले.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी एक ते दीड लाख भाविक येत असतात. त्यांना दर्शन मंडप, हिरकणी कक्ष, औषधोपचार कक्ष अशा विविध सुविधा एकाच छताखाली देण्यासाठी एखादी आपत्ती निर्माण झाल्यास मंदिर परिसर रिकामा असावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी शेतकरी संघ प्रशासनाला शेतकरी संघाचा पहिला मजला पुढील आदेश येईपर्यंत देवस्थान समितीच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला होता.जिल्हा प्रशासनाने अचानक दिलेल्या या आदेशामुळे शेतकरी संघाचे प्रशासकीय मंडळ कर्मचारी यांच्यामधून नाराजी व संताप व्यक्त करण्यात आला होता.जागे संदर्भात शेतकरी संघाचे अशासकीय मंडळाचे प्रशासक सुरेश देसाई यांनी संघाचे माजी संचालक कर्मचारी संघटना सभासद यांची सोमवार 25 रोजी शेतकरी संघामध्ये बैठक आयोजित केली होती.मात्र तत्पूर्वीच रविवारी सकाळी प्रशासनाने ही जागा ताब्यात घेऊन जागेची साफसफाई सुरू केली आहे.