देवस्थाने तसेच मंडळांची जय्यत तयारी
प्रतिनिधी/ बेळगाव
नवरात्रोत्सवाला रविवार दि. 15 पासून सुरुवात होणार आहे. यानिमित्त शहरामध्ये जय्यत तयारी केली जात आहे. दुर्गादेवीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी मंडप सजले आहेत. मंदिरांनाही रंगरंगोटी आणि सजावट केली आहे. मंदिरांमध्ये फुलांची आरास करण्यात आली आहे. विशेषत: रेणुका, भवानी, दुर्गा, मातंगी, मरगाई, अंबाबाई अशी देवींची शक्तीस्थळे असलेली मंदिरे सजली आहेत.
म्हैसूरप्रमाणेच बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. दुर्गादेवीचा जागर करत बेळगावमध्ये भव्य दुर्गामाता दौड काढली जाते. यावर्षी दुर्गामाता दौडचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने गल्लोगल्ली जय्यत तयारी करण्यात येत आहे. रविवारी शिवाजी उद्यान परिसरात दौड होणार असल्याने संपूर्ण परिसर भगवेमय झाला आहे. भगवे झेंडे, भगवे फेटे, पताका यामुळे शिवमय वातावरण तयार झाले आहे.
शहर तसेच उपनगरांमध्ये दांडिया उत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. उत्तर भारतीय संघटनांनी ठिकठिकाणी दांडियाचे आयोजन केले आहे. मारवाडी युवा मंच, गुजरात समाज यांच्या माध्यमातून भव्य दांडिया उत्सव आयोजित करण्यात आला आहे. याबरोबरीने गल्लोगल्ली दांडियाचे आयोजन केले जाणार असल्याने रोषणाई तसेच इतर व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गादेवीच्या मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाण बेळगावमध्ये वाढले आहे. समर्थनगर येथील मंडळाने शुक्रवारी रात्री घुबडावर आरुढ दुर्गादेवीच्या मुखदर्शनाचा सोहळा साजरा केला. याबरोबरच कांगली गल्ली येथील मंडळाने राजवाड्याची प्रतिकृती साकारली असून रविवारी दुर्गादेवीच्या मूर्तीचे आगमन होणार आहे. याबरोबरच शहर व उपनगरात विविध ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्ती आणल्या जाणार आहेत.
सोमवारचा दुर्गामाता दौडीचा मार्ग
चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरापासून दौडला सुरुवात होणार आहे. काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट कंपाऊंड, चव्हाट गल्ली, पी. बी. रोड, आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, किल्ला तलाव, गांधीनगर, किल्ला येथील दुर्गामाता मंदिर येथे सांगता होणार आहे.









