आकडेवारी समोर आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून देण्यात आली
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी परकीय चलन, त्यामध्ये नाणी, नोटा, सोन्या चांदीचे दागिने, मणी मंगळसूत्र जोडवी, पैंजण तसेच भारतीय चलन मिळून जवळपास 1 कोटी 11 लाख रूपयांचे दान केले आहे. बुधवारपर्यंत 7 दानपेट्यांची मोजदाद पूर्ण झाली आहे. त्यामधून ही आकडेवारी समोर आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
अंबाबाई मंदिर परिसरात असणाऱ्या गरूड मंडपात सोमवारी 10 दानपेट्या उघडण्यात आल्या. गेले दोन दिवस ही मोजदाद चालू आहे. बुधवारपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार 7 पेट्यातून तब्बल 1 कोटी 11 लाख रूपयांचे दान भाविकांनी केले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हे दान भाविकांकडून करण्यात आले आहे.
ऐन पावसातही अंबाबाईला भाविकांची चांगलीच गर्दी असल्याचे यातून दिसत आहे. कारण कोल्हापूर शहरात गेल्या 40 ते 50 दिवसात मोठया प्रमाणात पाऊस पडत होता. रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी असताना देखील अंबाबाई चरणी लाखो भाविक लीन झाले असल्याचे या आकडेवारीतून समोर येत आहे.
या दानपेट्यातील मोजदाद देवस्थान व्यवस्थापन विभागातील तब्बल 30 कर्मचाऱ्यांच्यामार्फत करण्यात येत आहे. अतिशय कडक सुरक्षेत आणि काळजीपूर्वक ही मोजदाद कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
2 पेट्यांची मोजदाद राहिली होती. बुधवारी त्यातील एका पेटीची मोजदाद झाली आहे. उरलेल्या एका पेटीची मोजदाद गुरूवार दुपारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. आणि सविस्तर पेटीप्रमाणे किती दान झाले आहेत. अशी संपूर्ण आकडेवारी मिळणार असल्याचे व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले आहे.
पितृ पंधरवड्यामुळे भाविकांची गर्दी कमी सध्या पितृ पंधरवडा चालू असल्याने भाविकांची गर्दी कमी आहे. तसेच गणेशोत्सव संपल्यानंतर दसऱ्यापर्यंत भाविकांची गर्दी कमी असते. या महिन्याच्या 22 तारखेपासून घटस्थापना आहे. घटस्थापना झाल्यानंतर भाविकांची गर्दी मंदिरात वाढणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरूवात होणार असल्याने मंदिर परिसरात आजपासून स्वच्छता मोहीम राबिण्यात येणार आहे. सध्या मंदिराची रंगरंगोटी, बांधकामाच्या कामांना नवरात्रीपूर्वी चांगलाच वेग चालू असल्याचे मंदिर परिसरात पाहायला मिळत आहे.
ऐन पावसातही भाविकांची गर्दी
“यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला जोरदार सूऊवात झाली. जिह्यासह शहरातही मोठया प्रमाणात पाऊस पडत होता. हवामान विभागाने जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरी देखील या दोन महिन्यात अंबाबाईचरणी मोठी रक्कम भाविकांनी दान केली असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे.”
अंतिम आकडेवारी आज दुपारपर्यंत समोर येईल
“सोमवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील 10 दानपेट्यांची मोजदाद सुरू झाली. मंगळवारपर्यंत 7 दान पेट्यातून तब्बल 1 कोटी 11 लाखांचे दान भाविकांनी या 45 ते 50 दिवसात केले आहे. आज दुपारपर्यंत अंतिम आकडेवारी समोर येईल. 30 कर्मचाऱ्यांकडून ही मोजदाद सुरू आहे.”
– महादेव दिंडे, मंदिर व्यवस्थापक








