ऑनलाईन टीम / मुंबई :
राजद्रोहाचा गुन्हा (The crime of treason) दाखल असलेले अमरावतीचे राणा दाम्पत्य (Rana couple) 29 एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयातील इतर प्रकरणांमुळे आजची सुनावणी रद्द करण्यात आली असून, ही सुनावणी उद्या दुपारी 3 वाजता होणार असल्याचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याची जामीनासाठी धावाधाव सुरू होती. राणांच्या जामीन याचिकेवर सरकारकडून आज उत्तर देण्यात येणार होते. त्यानंतर राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर युक्तीवाद होणार होता. मात्र, न्यायालयाच्या व्यस्त कामकाजामुळे आज होणारी सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली. याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली होती की, याचिकाकर्ते दाम्पत्य निवडून आलेले आमदार आणि खासदार आहेत. प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी आजच सुनावणी घेण्यात यावी. पण, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार इतर अनेक महत्त्वाची प्रकरणे असल्यामुळे राणा दाम्पत्यांची सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाकडे आज जराही वेळ नाही, असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राणा दाम्पत्याला आता जामीनासाठी उद्याची वाट पाहावी लागणार आहे. सध्या खा. नवनीत राणा यांना भायखळ्याच्या महिला कारागृहात तर आ. रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.








