मालवण तालुका उपाध्यक्ष सुशील खरात यांची टीका
मसुरे प्रतिनिधी:-
मालवण तालुक्यातील राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरुद्ध भाजप असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे.शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर व भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांच्यात शाब्दिक युद्ध चालू होती. त्यात शिवसेना उद्धव गटाचे देवली ग्रामपंचायत सदस्य नवनाथ झोरे यांनी उडी मारत भाजपच्या बाळा गोसावी यांच्या वरती टीका केली. त्यावर भाजप भटके विमुक्त आघाडी मालवण तालुका उपाध्यक्ष सुशील खरात यांनी झोरे यांचा खरपुस समाचार घेतला.
खरात यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात असे म्हटले आहे की, स्वयंम घोषित पुढारी नवनाथ झोरे यांनी बाळ गोसावी यांच्यावर टीका करण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांच्याकडून स्वतःच्या वाढीचा विकास तरी करून घ्यावा,पहिला स्वतःच्या घरी जाण्याचा रस्ता बनवा नंतर मालवण तालुक्यातील धनगर वस्तीच्या विकासाबाबत बोला. नवनाथ झोरे यांना तालुक्यात किती धनगर वस्त्या आहेत याची तरी माहिती आहे का..? माहिती असेल तर जाहीर करावी.
बाळा गोसावी काचेच्या घरात राहून देखील धनगर समाजासाठी त्यांच्या विकासासाठी रस्त्यावर उतरतात या सर्व गोष्टीला जनता साक्षी आहे, बाळा गोसावी यांच्याकडे भाजपा भटके विमुक्त आघाडीचे मालवण तालुका अध्यक्ष पद असताना तालुक्यातील धनगर वस्त्यांवरती भेटी गाठी घेणे त्यांच्या समस्या जाणून घेणे त्यांच्यावर होणारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अशा प्रकारचे अनेक विषय हात घेऊन त्यांनी जनजागृती केली आहे, धनगर समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी विविध विभागाकडे नागपूर येथे झालेल्या भटके विमुक्त आघाडीच्या अधिवेशनात पत्रव्यवहार करत धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात, धनगर समाजाला राजकीय क्षेत्रात स्थान मिळण्यासाठी देखील आवाज उठवला आहे. अशा व्यक्ती वरती टीका करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही, ओवालिये धनगरवाडी येथे स्फोटके वस्तीला धोका पोहोचवण्यात येत होता त्यावेळी तुम्ही कुठे होता नवनाथ झोरे कुठल्या बिळात लपून बसले होते. धनगर समाजाच्या जीवाचे रक्षण करण्याकरिता गोसावी साहेबच देवदूत म्हणून धावले होते.कोण नवनाथ झोरे…? तालुक्यात कोण ओळखते त्यांना काय केले त्यांनी धनगर समाजासाठी पुराव्यानिशी सिद्ध करावे असा थेट सवाल सुशील खरात यांनी केला आहे.









