निपाणी : येथील महामार्गानजीक सेवा रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने जवान जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गणेशनगरनजीक घडली. योगेश आप्पासाहेब दत्तवाडे (वय 24, रा. नवलिहाळ, ता. चिकोडी) हा जवान जागीच ठार झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला युवराज मल्लाप्पा कमते (वय 24, रा. नवलिहाळ) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. योगेश हा सुटीवर आला होता. गणेशनगरनजीक बुधवारी रात्री हॉटेलमध्ये जेवण करून परतताना थांबलेल्या ट्रकला धडक बसली. यात जवान योगेश दत्तवाडे हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या पाठीमागे बसलेला युवराज कमते हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला 108 रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे कर्मचारी तसेच सीपीआय संगमेश शिवयोगी, निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, निपाणी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार रमेश नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत जवान योगेश यांच्या पश्चात, आई, बहीण, भावोजी असा परिवार आहे.या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. या अपघातासंदर्भात युवराज कमते यांनी फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, गावातील सर्व नागरिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून योगेश यांना साश्रु नयनांनी निरोप दिला. यावेळी बेळगाव येथील महार 108 बटालियनचे जवान व मद्रास 10 बटालियनच्या जवान पार्थिव घेऊन नवलिहाळ येथे दाखल झाले. तेथून ट्रॅक्टरमधून पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तहसीलदार कार्यालय चिकोडी, प्रांताधिकारी कार्यालय चिकोडी, ग्रामपंचायत पंचायत कार्यालय नवलिहाळ, गाव चावडी यांच्याकडून पार्थिवाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्मशानभूमीनजीक जवान योगेश यांची आई, बहीण आणि मामांकडे ध्वज सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर शासकीय इतमामात श्रद्धांजली अर्पण करुन विधिवत दफनविधी करण्यात आला. गावातील सर्व दुकानदार व व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दत्तवाडे कुटुंबीयाने केलेला आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता. योगेश यांच्या लग्नाचीही घरात चर्चा सुरू होती. तत्पूर्वी घर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशा परिस्थितीत योगेश यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. 30 रोजी सकाळी 9 वाजता आहे.









