मंत्री मुश्रीफ यांनी सुपुत्र नवीद यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले
कागल : शनिवार दि. 31 सकाळी नऊची वेळ. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरासमोरील मंडपातील हे दृश्य. गोकुळच्या अध्यक्ष निवडीबद्दल नविद मुश्रीफ यांचे अभिनंदन करण्यासाठी जिह्यातील संस्थाप्रमुख आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. मंत्री हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांच्या गराड्यातच घरातून बाहेर आले आणि त्यांचे सुपुत्र व गोकुळचे नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी त्यांना मिठी मारली.
वडिलांना मिठी मारताच भावुक झालेल्या नवीद यांना त्यांच्या तोंडून शब्दही फुटेनात. परंतु, डोळ्यातील अश्रू मात्र वाहत होते. त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सुपुत्र नवीद यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि आशीर्वाद दिले. यावेळी त्यांनी नवीद यांना गोकुळच्या कारभाराविषयी सूचनाही दिल्या.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, पहाटे पाच वाजल्यापासून जनावरांच्या शेणा– मुतात हात घालून काबाडकष्ट करणाऱ्या माता–भगिनींच्या आणि शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून हा संघ फुलला आहे. गोकुळ दूध संघ म्हणजे शेतकऱ्यांच्या अविरत काबाडकष्टाचे श्रम मंदिर आहे. त्यांना सदैव न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहा.
सहकारात काम करीत असताना सभासद संस्था म्हणजेच शेतकरीच या गोकुळ दूध संघाचे मालक आहेत आणि आपण विश्वस्त आहोत, या भावनेनेच काटकसरीने आणि पारदर्शी काम करा. गोकुळ दूध संघाचा लौकिक उंचावण्यासाठी अहोरात्र कठोर परिश्रम घ्या, असेही ते म्हणाले.
ही माझी हतबलता..!
पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मंत्रीहसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ अध्यक्ष पदाच्या निवडीकामी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा मी अत्यंत आभारी आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांचे नाव निश्चित होणे, ही माझी हतबलता होती. तसेच; प्रत्येक माणसाबद्दल विशेषत: गोरगरिबांबद्दल आणि अगदी शत्रूबद्दलसुद्धा साफ नियत आणि दानत, गेली 35-40 वर्षे सामाजिक आणि राजकीय जीवनात कठोर परिश्रम ही पुण्याई माझ्या पाठीशी आहे.








