गोकुळच्या नव्या अध्यक्षपदाच्या विषयावर आज पडदा पडला आहे.
कोल्हापूर : गोकुळच्या चेअरमनपदी गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांची वर्णी लागली. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये नविद मुश्रीफ यांचे सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. मागील 20 दिवसांपासून सुरु असलेल्या गोकुळच्या नव्या अध्यक्षपदाच्या विषयावर आज पडदा पडला आहे.
दरम्यान, नविद मुश्रीफ यांची चेअरमनपदी निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे आभार मानले. या निवडीत आमदार सतेज पाटील यांची भूमिका कितपत होती, यावर नविद मुश्रीफ यांनी स्मितहास्य करत त्यांनीच माझे नाव दिले असल्याचे स्पष्ट केले आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नविद मुश्रीफ म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे खासकरुन आभार मानतो. जिल्ह्यातील सतेज पाटील, विनय कोरे, प्रकाश आबिटकर यांच्यासह सर्व नेत्यांचे आभार मानतो. सर्व संचालक मंडळाच्या सहकाऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासासाठी आणि खासकरुन विश्वास पाटील आणि अरुन डोंगळे यांनाही त्यांनी धन्यवाद दिले आहेत.
पुढे ते म्हणाले, आजवरचा सर्वात कमी वय असलेला चेअरमन म्हणून माझी निवड झाली आहे. ज्येष्ठांपासून ते तमाम दूध उत्पादन सभासदांनी फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. अशीच साथ भविष्यात मिळावी अशी विनंती त्यांनी केली आहे. काम करताना काही चुकल्यास त्याचवेळी अवगत करण्याचीही विनंती त्यांनी केली आहे.
गोकुळ दूधसंघ सध्या यशाच्या शिखराव पोचला आहे. आज दूघसंघ विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षात अमूलच्या बरोबरीने कार्यरत आहे. इथून पुढची आव्हानेही पेलण्यासाठी ताकद मिळावी. गोकुळ अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने झाला आहे. त्यामुळे हम सब एक है आणि राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचा हा चेअरमन असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. भविष्यात गोकुळ वाढीसाठी शासन दरबारी प्रयत्न करावे लागणार असल्याने मी सर्वांचे आभार मानले असल्याचे त्यांनी सांगितले.








