कोल्हापूर / संतोष पाटील :
जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) चेअरमन महायुतीचा की महाविकास आघाडीचा या वादात नविद मुश्रीफ यांची वर्णी लागली. निवडणूक वर्षात महायुतीचा दुसरा चेहरा अडचणीचा ठरला असता, यातूनच अपरिहार्यता म्हणूनच नवीद मुश्रीफ यांचे नाव पुढे आले. एका अर्थाने मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या रणनितीचा हा विजय म्हणावा लागेल. महायुतीच्या नावाखाली मुश्रीफ आणि पाटील जोडी फोडण्याचा डाव उधळला गेला आणि ही समझोता एक्सप्रेस सहकारात कायम राहणार असल्याचे संकेतही प्रचंड दबावाच्या राजकारणाताही चेअरमनपदाच्या निवडीतून दोघांनी दिले.
गोकुळच्या चेअरमनपदावरुन मागील महिन्यापासून राजकीय पटलावर तरंग उमठत होते. माळवते चेअरमन अरुण डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच राजीनामा देऊ. चेअरमन महायुतीचा व्हावा असे आदेश असल्याचे डोंगळे यांनी स्पष्ट केल्याने गोकुळचे संपूर्ण राजकारणच ढवळून निघाले. डोंगळे यांच्या बंडाने इच्छुकही थंड पडले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गोकुळच्या चिरेबंदी राजकारणात एंट्री झाली, मागील आठवड्यातील कोल्हापूर दौऱ्यात अजित पवार यांनी सतेज पाटील गटाचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांना चेअरमनपदासाठी शुभेच्छाही दिल्या. चुयेकर हेच चेअरमन असतील याचा दुजोराही नेत्यांनी दिला.
मात्र, मागील 24 तासात राजकारण 360 अंशात फिरले. कोणत्याही स्थितीत महायुतीचा चेअरमन व्हावा, मग तो कोणीही असो यावरुन मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर दबाव वाढत गेला. हसन मुश्रीफ यांनी अनेक वेळा खासगीत नविदला चेअरमन करणार नाही हे स्पष्ट केले होते. केडीसीसी बँकेचे चेअरमनपद आपल्याकडे आहे. आमदार मंत्री आहोत, गोकुळचे कारभारपण आपण करतो, माग मुलग्याला चेअरमन करायचा प्रश्नच येत नाही. मुलगा चेअरमन झाला तर सर्व पदे घरातच असा याचा उलटा राजकीय परिणामही होऊ शकतो. हे मुश्रीफ जाणून होते. त्यामुळे हसन मुश्रीफ हे नविद यांच्या नावाला तयार होणार नाहीत. त्यामुळे महायुती म्हणजेच शिंदे गटाकडेच हे पद जाईल अशी अटकळ बांधून मोर्चेबांधणी सुरू झाली होती.
गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या राजकारणातील महत्वाचा घटक असलेले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे विश्वासू सहकारी असल्याने आमदार विनय कोरे यांच्या शब्दाल येथे मोठे वजन आहे. विनय कोरे यांनी आपल्या गटाचे अमर पाटील यांचे नाव चेअरमनपदासाठी सुचवले. परिणामी महायुतीचा चेअरमन तोही नविद मुश्रीफ सोडून होईल, ही रणनिती बॅकफुटवर गेली. आमदार सतेज पाटील यांनी दोन पावले मागे येत, हसन मुश्रीफ यांची समजूत काढली. नविद मुश्रीफ चेअरमन होणे हेच निवडणूक वर्षासाठी महत्वाचे असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. नविद यांचे नाव पुढे आल्याने महायुतीचा चेअरमन झाला. आणि मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची गोकुळमधील समझोता एक्सप्रेसही कायम राहिली. निवडणूक वर्ष असल्याने महायुती म्हणून जोडण्या घालण्यात आपसूकच मर्यादा येणार आहेत. गोकुळचा बचाव करताना भविष्यात हसन मुश्रीफ यांना आपल्या घरातच पद का दिले ? याचा राजकीय गौप्यस्फोट होऊ न देता, अर्थबोध होईल असा खुलासा सवडीने करावा लागणार आहे, जिह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात ज्येष्ठत्व सांभाळणारे हसन मुश्रीफ विरोधकांच्या या टीकेवरही सहज मात करतील, अशी गोकुळ वर्तुळात चर्चा आहे.
- याराना कायम
मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचा जिह्यातील सहकाराच्या राजकारणातील याराना यानिवडीनंतरही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले. नविद मुश्रीफ हे महायुतीचा चेहरा असले तरी मुश्रीफ –पाटील गठबंधन सहकारात आणि गोकुळमध्ये तुर्तास तरी कायम राहणार असल्याचे यातून स्पष्ट झाले. महायुतीच्या नावाखाली या दोघांचा याराना तोडण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे. दोघातील ही युती पुढील काळात सहकारातील राजकारणात कसा रंग भरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.








