वार्षिक सर्वसाधारण सभेत कौतुकाचा वर्षाव
बेळगाव : एक तपानंतर संस्थेने न्यायालयीन लढा जिंकून दौलत साखर कारखान्यात अडकून पडलेली रक्कम व्याजासह 34 कोटी 16 लाख मिळाल्यामुळे नवहिंद सोसायटी अतिशय मजबूत झाली आहे. आम्ही कर्ज वसूल करण्यासाठी सक्षम आहोत. नवहिंदचे कार्य करण्याचे नियोजन वाखाणण्यासारखे आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे सोसायटी प्रगतीपथावर नेण्यासाठी मदत होते आणि सभासदांची संस्थेबद्दलची आस्था आम्हाला कार्य करण्यासाठी ऊर्जा देते, असे मनोगत सोसायटीचे चेअरमन उदय जाधव यांनी व्यक्त केले. ते नवहिंद सोसायटीच्या 31 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, संस्थेकडे 283 कोटीचे खेळते भांडवल, भागभांडवल 1 कोटी 98 लाख, स्वनिधी 14 कोटी 31 लाख, 37 कोटींची गुंतवणूक, ठेवी 260 कोटी, 226 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. या आर्थिक वर्षात संस्थेला 1 कोटी 11 लाखाचा नफा झाला असून भागधारकांना 12 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले. प्रारंभी संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वागतगीत म्हटले. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले. दीपप्रज्वलन चेअरमन प्रकाश अष्टेकर व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
वडगाव शाखा व्यवस्थापक दिनेश पाटील यांनी मागील वर्षाच्या सभेच्या वृत्तांताचे वाचन केले. येळ्ळूर शाखा व्यवस्थापक मदन पाटील यांनी ताळेबंदपत्रक, मुतगा शाखा व्यवस्थापक निलेश नाईक यांनी नफातोटा पत्रकाला मंजुरी घेतली. हुंचेनहट्टी शाखा व्यवस्थापक सागर जाधव यांनी नफा विभागणी, हेरे शाखा व्यवस्थापक युवराज शिंदे यांनी अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळविली. या सभेस असि. जनरल मॅनेजर एन. डी. वेर्णेकर, वसुली अधिकारी जे. एस. नांदूरकर, हेड ऑफिस मॅनेजर विवेक मोहिते, शाखा व्यवस्थापक संदीप बामणे व मान्यवर उपस्थित होते. विनोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश अष्टेकर यांनी आभार मानले.









