आयएनएस विक्रांत’वर प्रथमच बैठकीचे आयोजन
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतवर प्रथमच नौदल कमांडर्सची बैठक होत आहे. ही बैठक सोमवारपासून भरसमुद्रात सुरू झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सोमवारपासून या बैठकीला प्रारंभ झाला असून पुढील चार दिवस ती सुरू राहणार आहे. या बैठकीतील सविस्तर माहिती जारी केली जाणार नसली तरी सीडीएस अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी हे नौदलाच्या कमांडर्सशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह नौदल कमांडर्स बैठकीसाठी सोमवारी गोव्यात पोहोचले होते. त्यानंतर ते कार्यक्रमस्थळी रवाना झाले. या बैठकीमध्ये हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या हालचालींवरही चर्चा होऊ शकते. तसेच सेनादलांचे प्रमुख तिन्ही सेवांमध्ये अधिक चांगला समन्वय सुनिश्चित करण्यासाठी नौदलाच्या कमांडर्सशी चर्चा करतील. बैठकीत गेल्या सहा महिन्यात केलेले ऑपरेशन्स, लॉजिस्टिक, प्रशिक्षण आणि भविष्यातील योजना यावर चर्चा होणार आहे.









