प्रशिक्षण अन् प्रशासकीय सुविधेची केली पाहणी : अग्निवीरांच्या प्रशिक्षणाचे परीक्षण
प्रतिनिधी / बेळगाव
येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचा नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरिकुमार यांनी दि. 19 व 20 एप्रिल रोजी दौरा केला. नौदल प्रमुखांचा हा दौरा रेजिमेंटल सेंटरसाठी ऐतिहासिक ठरला आहे. या दौऱ्यादरम्यान नौदलप्रमुखांनी रेजिमेंटल सेंटरच्या प्रशिक्षण अन् प्रशासकीय सुविधेची पाहणी केली. तसेच अग्निवीरांच्या प्रशिक्षणाचे परीक्षण केले. तसेच रेजिमेंटल सेंटरमधील प्रशिक्षण सुविधेचा आढावा घेतला असून यादरम्यान त्यांना प्रशिक्षण पद्धतींविषयी माहिती देण्यात आली. शरकत वॉर मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करून नौदल प्रमुख आर. हरिकुमार यांनी राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या मराठा रेजिमेंटच्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. यानंतर अॅडमिरल आर. हरिकुमार यांना मानवंदना देण्यात आली.
बेळगाव येथील सैन्य केंद्रात सैनिकांना संबोधित करताना ऍडमिरल आर. हरिकुमार यांनी अग्निपथ योजना, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, आत्मनिर्भर भारत, सैनिकांकडून असलेल्या अपेक्षा आणि सशस्त्र दलांमधील ताळमेळ तसेच अंतर्गत संपर्क या मुद्द्यांवर विचार मांडले. याचबरोबर नौदल प्रमुखांनी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला भेट देत पॅडेट्सना संबोधित केले. संरक्षण दलांमध्ये कारकीर्द घडविण्यासाठी अधिक परिश्रम करण्याच्यादृष्टीने नौदल प्रमुखांनी पॅडेट्सना प्रोत्साहित केले.









