वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या पुरुष यू-23 राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नौशाद मुसा यांची नियुक्ती केली असल्याचे एआयएफएफने जाहीर केले. 1 जून रोजी मुसा कार्यभार स्वीकारतील. या दिवसापासून कोलकातामध्ये शिबीर सुरू होणार आहे. 2026 मध्ये जपानमधील आइची व नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघ तयार करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी युवा सेवा व क्रीडा मंत्रालयाने फेडरेशनकडे योजना आखून त्याचा आराखडा पाठविला आहे. मुसा यांच्या भारतीय संघाची पहिली लढत 18 जून रोजी ताजिकिस्तानविरुद्ध, 21 जून रोजी कीर्गीझ प्रजासत्ताकविरुद्ध डुशानबे येथे होईल. वरिष्ठ राष्ट्रीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्याशी चर्चा केल्यानंतर यू-23 संघ विकसित करण्यावर जोर देण्याचा निष्कर्ष फेडरेशनने काढला. या संघातील सर्वोत्तम खेळाडू वर्षातील दहा महिने सराव करीत आहेत. ते ज्या क्लबकडून खेळत आहेत, त्यांनी या खेळाडूंना राष्ट्रीय संघातून खेळण्याची मुभा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे एआयएफएफचे उपसरचिटणीस सत्यनारायण एम. म्हणाले.









