झारखंडमध्ये झाली कारवाई
वृत्तसंस्था/ रांची
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा आनंद व्यक्त करत लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानचे सोशल मीडियावर अभिनंदन करणाऱ्या मोहम्मद नौशादला झारखंडमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी बोकारोच्या मखदुमपूर येथे आरोपीला ताब्यात घेतले आहे.
35 वर्षीय आरोपी मोहम्मद नौशादने बिहारच्या मदरशामधून शिक्षण प्राप्त केले आहे. सध्या तो वडिलांसोबत बोकारो येथे राहतोय. त्याचा एक भाऊ दुबईत असून त्याच्या नावावरील सिमकार्डचा वापर करत नौशाद सोशल मीडिया अकौंट्स वापरत आहे. दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांबद्दल देश दु:ख व्यक्त करत असताना नौशाद मंगळवारी रात्री दहशतवाद्यांचे अभिनंदन करत होता.
पाकिस्तान, लष्कर-ए-तोयबा तुमचे अभिनंदन, संघ, भाजप, बजरंग दल आणि मीडियाला लक्ष्य केले तर आम्हाला अधिक आनंद होईल असे नौशादने एक्सवर उर्दू भाषेत लिहिले होते. याचबरोबर त्याने तीन स्माइली इमोजीसह स्वत:चा आनंद व्यक्त केला होता. यानंतर त्याने अनेक ट्विट केले, ज्यात अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथावणीपूर्ण वक्तव्यं आहेत.
नौशादच्या ट्विटनंतर लोकांनी सातत्याने झारखंड पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती. आरोपीने यापूर्वीही आक्षेपार्ह टिप्पणी केल्या होत्या. पुलवामा हल्ल्याबद्दलही त्याने चिथावणीपूर्ण वक्तव्य केले होते.
प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक मनोज स्वर्गीयारी यांनी एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीने बुधवारी सकाळी नौशादला अटक केली आहे. पोलीस स्थानकात त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करत त्याला न्यायालयात हजर केले जाणार होते.









