देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी : महाप्रसादाचे केले होते आयोजन
बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या शाकंभरी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या यात्रेनंतर नौगोबा यात्रा रविवारी बेळगावात उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पडल्या भरून ही यात्रा साजरी करण्यात आली. ‘उदं गं यल्लम्मा उदं’च्या जयघोषामध्ये नौगोबा यात्रा पार पडली. शिवाजीनगर परिसरातील केएसआरटीसी कंपाऊंड तसेच किल्ला व तानाजी गल्ली ओव्हरब्रिज परिसरात यात्रेकरूंची मोठी गर्दी झाली होती. शहर देवस्थान मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी नौगोबाची यात्रा भरविली जाते. गुरुवारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती येथे यल्लम्मादेवीची यात्रा भरली होती. बेळगाव शहरासह उपनगरांमधून लाखो भाविक सौंदत्ती यल्लम्माच्या दर्शनाला गेले होते. सौंदत्ती येथून परतल्यानंतर सर्व भाविक शिवाजीनगर, गांधीनगर, किल्ला व तानाजी गल्ली रेल्वे ओव्हरब्रिज परिसरात वास्तव्य करतात. रविवारी दुपारनंतर शिवाजीनगर येथील केएसआरटीसी कंपाऊंडमध्ये नौगोबा यात्रा भरविण्यात आली होती. अनंतशयन गल्ली येथील रेणुकादेवी मुखवट्याबरोबरच गणाचारी गल्ली येथील सासनकाठी, बिरदेव, त्याचबरोबर महालक्ष्मी देवी, कसाई गल्ली येथील मातंगी देवी यांची विधिवत पूजा करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भंडाऱ्याची उधळण करत या ठिकाणी महिला भाविकांनी पडली भरण्याचा विधी केला. शहर देवस्थान मंडळाचे रणजित चव्हाण-पाटील, परशुराम माळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जग आपापल्या ठिकाणी परतले. त्यानंतर परंपरेप्रमाणे पाटील गल्ली येथील हक्कदार चव्हाण-पाटील यांच्या घरी मुखवटे नेण्यात आले.
किल्ला येथे महाप्रसाद
बेळगाव शहर व उपनगरांतील काही भाविक किल्ला येथे वास्तव्यास होते. रविवारी सकाळी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सामूहिक आरती व त्यानंतर पडली भरण्याचा कार्यक्रम झाला. भाविकांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. एक हजारहून अधिक भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.









