बेळगाव : शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती डोंगरावर यल्लम्मा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानंतर बेळगावमध्ये परतलेल्या नागरिकांची रविवारी नौगोबा यात्रा जल्लोषात पार पडली. पारंपरिक पद्धतीने बेळगाव शहरातील यल्लम्मा देवीच्या भक्तांनी परडी भरण्याचा कार्यक्रम केला. ‘उदं गं यल्लम्मा उदं’ च्या जयघोषात नौगोबा यात्रा पार पडली. शहरातील शिवाजीनगर येथील केएसआरटीसी कंपाऊंड, किल्ला तसेच तानाजी गल्ली रेल्वेगेट परिसरात यात्रा पार पडली.
बेळगावमधील हजारो नागरिक शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनाला गेले होते. त्या ठिकाणी सामूहिक परडी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर हे भाविक पुन्हा बेळगावमध्ये परतले. बेळगावमध्ये आल्यानंतर थेट घरी न जाता शहराच्या विविध भागात नौगोबा यात्रा करून मगच ते आपापल्या घरी जातात. शहर देवस्थान पंच मंडळाच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात नौगोबाची यात्रा आयोजित केली जाते.
केएसआरटीसी डेपो परिसरात नौगोबा यात्रेसाठी शनिवारी सायंकाळपासून तयारी सुरू होती. अनंतशयन गल्ली येथील रेणुका देवीच्या मुखवट्यासोबत गणाचारी गल्ली येथील सासनकाठी, बिरदेव त्याचबरोबर महालक्ष्मी देवी कसाई गल्ली येथील मातंगी देवी यांची विधिवत पूजा करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी शहर देवस्थान मंडळाचे सदस्य रणजित चव्हाण-पाटील, परशुराम माळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
किल्ला येथे रेणुका भक्तांची गर्दी
पारंपरिक पद्धतीने किल्ला परिसरात यात्रा भरविली जाते.शहर परिसरातील काही रेणुका भक्त सौंदत्तीहून आल्यानंतर या ठिकाणी वास्तव्यास होते. या ठिकाणची यात्रा शुक्रवारी पार पडली. रेणुका देवीच्या जगाची पूजा केल्यानंतर सामूहिक परडी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.









