शेती, माती, निसर्ग आणि माणूस केंद्रस्थानी ठेवत सर्वदूर आपल्या चैतन्यदायी कवितेचे चांदणे शिंपित जाणाऱ्या रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्व एका निसर्गयात्रीलाच मुकला आहे. मागच्या पाच-साडेपाच दशकांची महानोर यांची कारकीर्द म्हणजे निसर्गसोहळाच ठरावा. वास्तविक निसर्गकवितेची मराठीला समृद्ध परंपरा लाभली आहे. केशवसुत, बा. भ. बोरकर, बालकवींपासून मंगेश पाडगावकरांपर्यंत अनेक कवींनी आपल्या कवितेतून निसर्ग अलगद पकडल्याचे दिसून येते. किंबहुना, महानोरांची कविता या सगळ्यांपेक्षा काहीशी वेगळी ठरते. या कवितेचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे तिचा अस्सलपणा. तो पाहता तिला मनमोहक रानफूलाचीच उपमा द्यावी लागेल. रानफूल, त्याचे सौंदर्य केवळ एका मर्यादेपर्यंत राहत नाही. तर त्याचे अस्तित्व संपूर्ण आसमंतासच व्यापून टाकते. महानोरांची कविता अशीच रानभूल पाडणारी. तशी त्यांच्या आधीची निसर्गकविता ही बव्हंशी रोमँटिक. वेगवेगळ्या रंगांनी नटलेली. हिरवाईशी घट्ट नाते सांगणाऱ्या महानोरांच्या काव्याला तर अनंत छटा लाभलेल्या. अनेकविध रंग जसे निसर्गास खुलवित असतात, तद्वत अवतीभवतीचा गंधही मानवी मनास भुरळ घालत असतो. महानोरांची कविता भुईशी, मातीशी नाळ जुळलेली. त्यामुळे तिचा मृद्गंध सर्वत्र भरून राहतो. तसा त्यांचा मूळ पिंड शेतकऱ्याचा. जळगाव व छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीवरील पळसखेड गाव ही त्यांची कर्मभूमी. पळसखेडच्या शेतीसाठीच त्यांनी शिक्षण जोडले. तथापि, या शेतीतूनच आपल्या कवितेचा मळा ते फुलवित राहिलेले पहायला मिळतात. अजिंठ्याचा हिरवागार परिसर, त्याच्या कुशीत वसलेले खेडे, झाडांची दाटी, झऱ्यांची झुळझुळ, पक्ष्यांची किलबिल या सगळ्यांशी कवी आणि शेतकरी म्हणून दादा ज्या घट्टपणे जोडले गेले, ते विलक्षणच. ज्वारी, बाजरी, कापूस, चवळी, तुरीसारखी पिके असतील. मोसंबी, सीताफळ, केळी, डाळिंबासारखी फळे व कडुनिंब वा इतर वनश्री असेल. महानोरांसारखा कवी त्यात पूर्णपणे एकजीव होऊन जातो. तर कधी अवर्षण, दुष्काळाच्या वेदनेने सुन्न होणारा हा कवी पावसाळ्यातल्या सुंदर दिवसांमध्ये रान आबादानी होत असताना हरखूनही जातो. वास्तविक या साऱ्याशी साधल्या जाणाऱ्या एकरूपत्वातूनच ना.धों.ची कविता अधिक जवळची वाटते. ‘रानातल्या कविता’ हा त्यांचा 1966 मध्ये प्रसिद्ध झालेला पहिलावहिला कवितासंग्रह म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष जीवनानुभवच. ‘या शेताने लळा लाविला असा, की सुख दु:खाला परस्परांशी हसलो रडलो,’ किंवा ‘गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे’, या काव्यपंक्तीतून शेतीवरील त्यांच्या ममत्वाचीच प्रचिती येते. रानावनाशी, शेतीमातीशी ऋणानुबंध जोडणाऱ्या या महाकवीचे ‘पळसखेडची गाणी’, ‘पावसाळी कविता’, ‘वही’, ‘अजिंठा’, हे कवितासंग्रहही असाच ठाव घेतात. ‘पावसाळी कवितां’मधील पाऊस बहुपदरीच. ‘मन ऐसे डोहाच्या गडदगर्द पाण्यापारी, देहावर चरणाऱ्या पापाला बळ भारी,’ वा जांभळ्या पंखांचा तांडा आभाळभर गतिमान सन्नाट माझ्या डोळ्यांतील आभाळाहूनही..’ या ओळी असोत. यातील खोली मनाला भिडते. महानोरांच्या कवितेची भाषा, बाज वेगळा आहे. तिच्यात एक ग्रामीण गोडवा आहे. तोच तिचे अस्सलपण अधोरेखित करतो. गेयता हेदेखील त्यांच्या कवितेचे बलस्थान म्हणता येईल. गेयतेमुळेच त्यांची कविता ओठावर सहजपणे ऊळते. लोकगीतांसारखी रेंगाळत राहते. गीतकार म्हणूनही ना. धों. रसिकप्रिय ठरतात, ते या भाषेतील गोडवा व मूळच्या गेयतेमुळेच. ‘जैत रे जैत’ ही मराठीतील एक संस्मरणीय चित्रकृती म्हणून प्रसिद्ध आहे. यातील गीते अजरामर होतात, ती महानोरी शब्दछटांमुळेच. मी रात टाकली, मी कात टाकली…या गीतातील अर्थाची सखोलता हे त्यांच्या प्रतिभेच्या अफाटतेचा मूर्तिमंत आविष्कारच ठरावा. ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’, यातील आबादानी हा शब्द संपूर्ण गाण्याला नवे परिमाण देतो. नभ उतरू आलं, चिंब थरथर झालं..हे गीतही असेच झिम्माड. गाणे गाताना अशा शब्दांचा उच्चार किती आनंदादायी असतो, हे स्वत: जेव्हा आशाताईंसारखी महान गायिका सांगते, तेव्हाच त्यातील मर्म उलगडते. शेती आणि साहित्य हा प्रवास महानोर यांनी आपल्या आयुष्यात समांतरपणे सुरू ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळे कवी आणि शेतकरी यापैकी त्यांचे पहिले प्रेम कोणते, असा प्रश्न कुणासही पडावा. तथापि, आपल्या हयातीतच ना.धो.ंनी त्याचे उत्तर दिले आहे. मी प्रथम शेतकरी, नंतर साहित्यिक असल्याचे त्यांनी सांगून ठेवले आहे. ते खरेच. ज्या तन्मयतेने त्यांनी कविता रचना केल्या, त्याच मायेने त्यांनी शेती केली, त्यात विविध प्रयोग केले. आपली भूमी, झाडे, निसर्ग, पशुपक्षी अन् एकूणच साऱ्या परिसराशी त्यांनी साधलेले हे अद्वैत म्हणूनच असाधारण म्हणता येईल. याशिवाय ‘जलसंधारण,’ ‘ठिबक फळबागा,’ याबरोबरच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना ऊजविण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे त्यांचे मोठे योगदान होय. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांपासून ते शरद पवारांपर्यंत सर्वांशी सलोख्याचे संबंध असणाऱ्या महानोरांनी विधान परिषदेचे आमदार म्हणूनही दोन टर्म काम केले. या बारा वर्षांच्या कार्यकाळात शेतीतील विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यात त्यांचा पुढाकार असे. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी सुरू केलेल्या कार्यवाहीला त्यांनी दिलेले पाठबळ, हे उदाहरण त्यांच्यातील राजकारण्यालाही शेतकऱ्यांबद्दल मनस्वी किती आस्था होती, हे दाखविण्यासाठी पुरेसे ठरावे. प्रतिभावंत कवी, प्रयोगशील शेतकरी अन् संवेदनशील राजकारण्याबरोबरच माणूस म्हणूनही महानोर सर्वोत्तम होते. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी माणसे जोडली. पळसखेडच्या त्यांच्या शेतावर सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रापासून सगळ्याच क्षेत्रातील लोक येऊन जातात नि ते त्यांचे मनापासून आदरातिथ्य करण्यात गुंतून जातात. साठोत्तरी कवितेला खऱ्या सुगीचे दिवस दाखविणाऱ्या या ‘निसर्गयात्री’ला भावपूर्ण आदरांजली!
Previous Articleअवघ्या चार महिन्यात विल्यम्सन न्यूझीलंड संघात
Next Article 15 वर्षांमध्ये प्रथमच झोमॅटो नफ्यात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








