संयुक्त राष्ट्रसंघाचा दावा : जगासाठी मोठा धोका
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
अफगाणिस्तानात सोडण्यात आलेली नाटो देशांची शस्त्रास्त्रs आता जगभरातील दहशतवादी संघटनांकडे पोहोचत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. दहशतवादी संघटना आयएसआयएल विषयक 17 व्या महासचिवांच्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
नाटोची शस्त्रास्त्रs अफगाणिस्तानातून मध्यपूर्वेत आणि मग आफ्रिकेपर्यंत पोहोचली आहेत. पाकिस्तानात एकामागोमाग एक दहशतवादी हल्ले करणाऱ्या टीटीपीकडे देखील आता नाटो देशांची शस्त्रास्त्रs आहेत. तर जगातील सर्वाधिक संघर्ष चाललेल्या भागांमध्ये आयएसआयएल आता छोटी स्फोटके तयार करत आहे.
आयएसआयएलने अत्याधुनिक स्फोटके अन् ड्रोन तयार करण्यासाठी एक विभाग निर्माण केला आहे. तर आयएसआयएल-के आता अफगाणिस्तान आणि आसपासच्या भागांमध्ये सर्वात मोठा सुरक्षेचा धोका ठरत आहे. या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांची संख्या 4 ते 6 हजारांदरम्यान असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने स्वत:च्या अहवालात नमूद केले आहे.
सनाउल्लाह गफारी जून महिन्यात मारला गेल्यावर मालावी रजाब हा आयएसआयएल-केचा म्होरक्या आहे. आयएसआयएल-के आता अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला आव्हान देत आहे. या दहशतवादी संघटनेकडून आता हल्ल्यांसाठी आंतरराष्ट्रीय लक्ष्यांची निवड केली जात आहे.
अफगाणिस्तानच्या बाल्ख, बादखशान आणि बाघलान प्रांतात आयएसआयएल-केचे दहशतवादी तालिबानच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ले करत आहे. आयएसआयएल-के या संघटनेला आता तालिबानच्या विरोधात लढण्यासाठी नवे सदस्यही मिळू लागले आहेत.
भारतासाठीही धोका
भारतीय उपखंडात अल-कायदाचे काही घटक आयएसआयएल-केमध्ये सामील होत आहेत किंवा त्याच्यासोबत काम करण्यास तयार आहेत. यामुळे या भागालाही धोका असल्याचे अहवाल तयार करणाऱ्या समितीच्या एका सदस्याने म्हटले आहे.









