मंत्रिपद न मिळाल्याने आबिटकर गटाला सल
गारगोटी/अनिल कामीरकर
राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी शिवसेनेची साथ सोडून मुख्यमंत्री शिंदेंना पाठींबा दिला, ते शिंदे गटासोबत असले तरी भुदरगड तालुक्यातील मूळ शिवसैनिकांनी शिवसेनेबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार आबिटकर गटाचे स्वतंत्र अस्तित्व भुदरगड तालुक्यात आहे, मात्र खासदार मंडलिक यांचा निर्णय धक्का देणारा ठरला आहे. आमदार आबिटकर यांना मंत्रिपद न मिळाल्याची सल त्यांच्या कार्यकर्त्यांत असल्याने त्या दबावापोटीच त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
आमदार आबिटकर यांनी कोटय़ावधीचा निधी तालुक्यात आणला आहे. सातत्यपूर्ण संपर्क व युवक वर्गाशी घट्ट नाते ही त्यांची मतदारसंघावरील पकड घट्ट करणारी आहेत. आबीटकर यांचा निर्णय अनपेक्षित की ठरल्याप्रमाणे.., यांचे उत्तर गुलदस्त्यात आहे. कारण पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरेंशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते.
तालुक्यात गावोगावी निधी उपलब्ध करून विकासकामे करण्याचा त्यांनी धडाका लावला होता, पण अचानक त्यांच्या शिंदे गटाबरोबर जाण्याने तालुक्यात खळबळ उडाली. आमदार आबीटकर हे दोन दिवस गारगोटीत आल्यानंतर त्यांची शेकडो कार्यकर्त्यांनी भेट घेतली. आबीटकर यांनीही राज्यातील घडामोडीविषयी विस्तृत माहिती दिली.
जिह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आबिटकर आहेत. नैसर्गिक हक्काने त्यांना मंत्रिपद मिळणे आवश्यक असताना त्यांच्यावर अन्याय झाला, याची खंत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होतीच. विशेष म्हणजे आबीटकर यांची दुसरी टर्म असून देखील त्यांनी आपले, आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवले. त्यांनी मतदारसंघात शिवसेनेच्या शाखा काढल्या नाहीत की प्रमुख कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या पदाधिकारी पदी बसवले नाही. शिवसेनेची तालुक्यातील सर्व पदे जुन्याच शिवसैनिकांना दिली होती. त्यामुळे भविष्यात आबिटकर यांच्यासमोर फार नुकसानकारक परिस्थीती उद्भवणार नाही, असे चित्र आहे.
मुख्यमंत्री शिंदेंबरोबर आबिटकर यांचे निकटचे संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातूनच गेली अडीच वर्षे त्यांनी मोठय़ा प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे. भविष्यातही त्यांच्या माध्यमातूनच मोठय़ा प्रमाणात तालुक्यात निधी येईल, अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यांची यांची विचारसरणी जपणारा गट तालुक्यात आहे. खासदार मंडलिक यांचा भुदरगड तालुक्यात निधी अपुरा आहेच, पण त्यांची सर्व मदार आमदार आबिटकर यांच्या विकासकामांवर आहे. पण खासदार मंडलिक यांचा बंडखोरीचा निर्णय मात्र तालुक्यातील सर्वसामान्यांना रूचलेला नाही, असे चित्र पहावयास मिळत आहे.