ऑनलाईन टीम / तरुण भारत :
देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वेगाने वाढत आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय खडबडून जागं झालं आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयातील यंत्रणा कितपत सज्ज आहे, हे पाहण्यासाठी 10 आणि 11 एप्रिलला देशव्यापी मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडीओ कॉन्स्फरन्स झाली. या बैठकीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत तज्ञ मंडळींनी आपापली मते मांडली. यावेळी कोरोनाला परतवून लावण्यासाठी आपण किती सक्षम आहोत, हे पाहण्यासाठी देशभरात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही राज्यांमध्ये कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना कोरोना नियमावली जाहीर करण्याची विनंती केली आहे. जेणकरुन वेळेत कोरोनाला रोखता येईल.
दरम्यान, गुरुवारी देशभरात 6050 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारच्या तुलनेत ही वाढ 13 टक्के इतकी आहे. त्यामुळे ज्ये÷ व्यक्ती आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याची गरज आहे. मागणी नसली तरीही लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.