अजित पवार यांचे संकेत, तेव्हाच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये बदल झाल्याचीही टिप्पणी
► पुणे / प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिले. तेव्हाच्या आणि आताच्या अजित पवारमध्ये बराच बदल झाला आहे. वय वाढल्यावर माणसामध्ये मॅच्य्ऊरिटी येते. पूर्वी चुकांवर पांघरूण घालण्यासाठी पवारसाहेब असायचे, पण आता ती जबाबदारी स्वत:वर आली असल्याची मिश्कील टिप्पणीही त्यांनी या वेळी केली.
पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामठे आणि राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते, जिल्हा भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे पाटील, शरद पवार गटाच्या नेत्या स्वाती चिटणीस यासह अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज ज्या मंडळींचा प्रवेश झाला आहे. त्या सर्वांनी यापुढील काळात एकत्रित काम करायचे आहे. आपल्या प्रत्येकाला एकमेकांचे स्वभाव, काम करण्याची पद्धत आणि मतेदेखील माहिती आहे. अजित पवाराला भेटावे की नाही. त्याचा मूड आहे की नाही, हे जालिंदरला चांगलाच माहिती आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही इकडे तिकडे काही बोललात, की त्याचा परिणाम पक्षावर होतो. म्हणूनच सांगतो सुसंस्कृतपणाने बोला. ज्याला आपण पक्षात घेत आहोत त्याची प्रतिमा जनमाणसात चांगली असली पाहिजे. त्याच्यावर चुकीचे आरोप किंवा चुकीच्या केसेस नसाव्यात लोकांकडे जाताना आपल्याला विश्वासाने जाता यायला पाहिजे असेही अजित पवार यांनी सांगितले.
आपल्या व्यक्तिमत्त्वात झालेल्या बदलावर बोलताना अजित पवार म्हणाले, की मागचा अजित पवार आणि आत्ताचा अजित पवार, यामध्ये खूप फरक झाला आहे. काळानुसार जसे वय वाढते, तसे आपल्याला बदलावे लागते आणि त्यातूनच मॅच्युरिटी येते. पूर्वी आम्ही काही केले, तर आमच्यावर पांघरूण घालायला साहेब असायचे. आता आपल्यालाच इतरांवर पांघरूण घालायचे आहे.
काही दिवसांपूर्वी केलेल्या ‘आपल्याला दिल्लीत जाऊन कोणाला विचारावे लागत नाही’ या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे सांगत अजित पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की काँग्रेस भाजप किंवा पवार साहेबांच्या पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांना तिथे जावे लागते. मी त्या हेतूने बोललो होतो. मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि मी मुंबई, पुणे किंवा बारामतीत असतो. त्यामुळे आम्हाला आमचे निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जायची गरज नाही, आम्ही इथे बसूनच आमचे निर्णय घेऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वबळाचा नारा
अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. त्याचबरोबर पक्ष सोडून गेलेल्यांवरही कठोर शब्दांत टीका केली. शिरूरमधील एका नातेवाईकाचा उल्लेख करत त्यांनी थेट इशारा दिला. ते म्हणाले, की माझी भावकीच मला सोडून गेली. तो बिचारा पालकमंत्रिपदाची स्वप्ने पाहत होता. पण मी त्याला स्पष्ट सांगितले आहे, की आता तू मला सोडून गेला आहेस. त्यामुळे मी तुला निवडणुकीत पाडणारच. तो कसा निवडून येतो तेच मी पाहणार आहे, असा थेट इशारा त्यांनी दिल्याचे सांगितले. तुम्ही कुणाबरोबरही राहा, पण निष्ठेने राहा. दोन-तीनडगरीवर हात ठेवायचा प्रयत्न केला, तर काहीच हातात राहत नाही. त्यामुळे निष्ठेला महत्त्व आहे, असे ते म्हणाले.
निवडणुकीच्या तयारीला लागा; ’इलेक्टिव्ह मेरिट’ हाच निकष
गेली चार वर्षे जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. पण, आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.








