राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमावर विरोधीपक्षांकडून बहिष्कार टाकण्याच्या कृतीचे समर्थन करून योग्य निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तसेच निर्णय प्रक्रियेत संसदेतील खासदारांना विश्वासात घेतले जात नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार असून कॉंग्रेस पक्षासह देशातील 20 पक्षांनी य़ाला विरोध दर्शविला आहे. विरोधकांनी पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते या नविन वास्तूचे उद्धाटन व्हावे असा आग्रह धरून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
हेही वाचा >>>> नव्या संसद भवनात जे काही चाललंय ते एकदम उलटं…आमची बांधिलकी जुन्या वास्तुशी
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले कि, “मी अनेक वर्षे खासदार होतो आणि सध्याची स्वातंत्र्यपुर्व काळातील संसदेची वास्तू चांगल्या अवस्थेत आहे. संसदेची नवीन इमारत बांधली जात असल्याचे वृत्तपत्रात आपल्याला कळालं” असे ते म्हणाले.
तसेच “संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाबाबत आमचा सल्ला घेण्यात आला नाही. नियमानुसार, भारताचे राष्ट्रपती दरवर्षी संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. त्यामुळे हे उघड आहे की राष्ट्रपतींनी नवीन इमारतीचे उद्घाटन करायला हवं. कुणालाही विश्वासात घेतले जात नसल्याने वरिष्ठ विरोधी पक्षांचे नेत्यांनी यावर बहिष्कार टाकला हे अगदी योग्य असून मला मान्य आहे.” अशी ही बाजू शरद पवारांनी मांडली.