वृत्तसंस्था / कोटा (रास्थान)
20 वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेला येथील रघुराय इनडोअर क्रीडा संकुलात मोठ्या थाटात प्रारंभ झाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते यास्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर स्पर्धा अखिल भारतीय कुस्ती फेडरेशन आणि राजस्थान राज्यस्तरीय कुस्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे.
सदर स्पर्धा ग्रिको रोमन आणि फ्रीस्टाईल या प्रकारामध्ये विविध वजन गटात घेतली जात आहे. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र लढती आयोजित केल्या आहेत. पुरुषांच्या 57 किलो गटात फ्रीस्टाईल प्रकारामध्ये दिल्लीच्या अंकुशने, 70 किलो गटात दिल्लीच्या सागरने, 86 किलो गटात हरियाणाच्या सचिनने, 125 वजन गटात पंजाबच्या जेसपुरनने सुवर्ण पदके मिळविली. 86 किलो गटात महाराष्ट्राच्या अर्जुनने कांस्य पदक मिळविले. ग्रिको रोमन प्रकारात 60 किलो वजन गटात हरियाणाच्या सुरजने सुवर्ण, महाराष्ट्राच्या समर्थने रौप्य, 72 किलो वजन गटात हरियाणाच्या आकाशने सुवर्ण, 97 किलो वजन गटात दिल्लीच्या नमनने सुवर्ण तर कर्नाटकाच्या राघवेंद्रने कांस्य पदक घेतले.
महिलांच्या 55 किलो वजन गटात हरियाणाच्या रिनाने सुवर्ण, महाराष्ट्राच्या अहिल्याने कांस्य पदक मिळविले. 62 किलो गटात महाराष्ट्राच्या प्रगतीने सुवर्ण पदक, 76 किलो गटात हरियाणाच्या प्रियाने सुवर्ण पदक पटकाविले.









