पुणे / प्रतिनिधी :
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशात एकूण ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातून मृणाल गांजाळे या एकमेव शिक्षिका आहेत.
शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कांचे वितरण केले जाते. यंदा मंत्रालयाकडून ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मृणाल गांजाळे या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत. तसेच २०२३-२४ च्या शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलोच्या मानकरीही ठरल्या आहेत. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे.








