वृत्तसंस्था/ भुवनेश्वर (ओडिशा)
येथे नुकत्याच झालेल्या 39 व्या उपकनिष्ठांच्या तसेच 49 व्या कनिष्ठांच्या राष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या जलतरण स्पर्धेत कर्नाटकाच्या स्पर्धकांनी दर्जेदार कामगिरी करत पुन्हा सर्वंकष जेतेपद स्वत:कडे राखले. या स्पर्धेत कर्नाटकाच्या जलतरणपटूंनी 50 सुवर्ण, 42 रौप्य आणि 27 कास्य अशी एकूण 119 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर राहिला.
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी या स्पर्धेत 11 सुवर्ण, 24 रौप्य आणि 19 कास्य पदकांसह सर्वंकष विभागात दुसरे स्थान तर तामिळनाडूने 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 18 कास्य पदकांसह तिसरे स्थान पटकाविले. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चार नवे स्पर्धा विक्रम नोंदविले गेले. महाराष्ट्राच्या पालक जोशीने मुलींच्या गट एकमधील 200 मि. बॅकस्ट्रोक प्रकारात नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक हस्तगत केले. कर्नाटकाच्या रिद्दीमा विरेंद्रकुमारला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलांच्या गट दोनमधील 200 मि. बॅकस्ट्रोक प्रकारात कर्नाटकाच्या वेदांत माधीरने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळविले. कर्नाटकाच्या तानीशी गुप्ता आणि डी. देसिंगु यांच्यात मुलींच्या गट दोन 50 मि. बटरफ्लॉय प्रकारात कडवी चुरस पहावयास मिळाली.
या स्पर्धेमध्ये मुलांच्या गट एकमध्ये राजस्थानच्या युग चिलेनीला सर्वोत्तम जलतरणपटू म्हणून गौरविण्यात आले. मुलांच्या गट दोनमध्ये कर्नाटकाचा इशान मेहरा, मुलांच्या गट तीनमध्ये तामिळनाडूचा अब्दुल हफीज, मुलींच्या गट एकमध्ये तामिळनाडूची व्ही. अगरवाल, मुलींच्या गट दोनमध्ये कर्नाटकाची तानीशी गुप्ता, मुलींच्या गट तीनमध्ये बंगालची एस. मुखर्जी यांची सर्वोत्तम जलतरणपटू म्हणून निवड करण्यात आली. या सर्वोत्तम जलतरणपटूंचा गौरव करण्यात आला. तेलंगणाच्या व्ही. अगरवालची सर्वोत्तम महिला जलतरणपटू म्हणून निवड केली असून तिने या स्पर्धेत 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळविले आहे.









