12 राज्यांचा समावेश : स्पोर्टींग प्लॅनेट मैदानावर होणार सामने
बेळगाव : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मान्यता प्राप्त कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना व बीडीएफए बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकमान्य सोसायटी पुरस्कृत राष्ट्रीय सबज्युनियर मुलींच्या चौदा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा बेळगाव येथील स्पोर्टींग प्लॅनेट लव्हडेल स्कूलच्या टर्फ मैदानावरती 15 ते 24 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी 8.30 वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार असून 12 राज्यानी या स्पर्धेत सहभाग दर्शविला आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब यानी दिली.
तरूण भारतशी बोलताना ते म्हणाले, या स्पर्धेत एकूण 12 राज्यांनी सहभाग घेतला असून अ गटात तेलंगणा, ओडीसा, चंदीगड, राजस्थान, ब गटात केरळ, उत्तरप्रदेश, त्रिपुरा, सी गटात आंध्रप्रदेश, हिमालचल प्रदेश, दिल्ली, ड गटात जम्मू-काश्मिर, कर्नाटक, मध्यप्रदेश असे संघ विभागण्यात आले आहेत. बेळगावात प्रथमच उपकनिष्ठांच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन ऑल इंडिया फेडरेशनने कर्नाटक फुटबॉल संघटनेच्या शिफारसीनुसार बेळगावला मोठी स्पर्धा भरविण्याची संधी मिळाली आहे. त्यानुसार या स्पर्धा बेळगावात शुक्रवारपासून भरविल्या जात आहेत. सर्व सहभागी संघांना राहण्याची, जेवण्याची सोय विविध ठिकाणी करण्यात आली असून स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून आमदार राजू सेठ, लोकमान्य सोसायटीचे पदाधिकारी, सामनाधिकारी जोगेंद्र प्रतापसिंग, जोनाथन डिसोजा, नेहा चानु, कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी अस्लम खानसरवाल, उपाध्यक्ष अमित पाटील, पेट्रॉन्। राम हदगल, संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, गोपाळ खांडे, लेस्टर डिसोजा, एस. एस. नरगुडी, व्हिक्टर परेरा, उमेश मजुकर, मतीन इनामदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना राजस्थान वि. तेलंगणा यांच्यात सकाळी 8.30 वा. खेळविण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात ओडीसा वि. चंदीगड यांच्यात दुपारी 3 वा., तिसरा सामना आंध्रप्रदेश वि. दिल्ली 5.30 वा. खेळविण्यात येणार आहे.









