कोट्यावधी रुपये खर्च करून गोव्यात 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत आहे. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी 37 खेळ निश्चित करण्यात आले आहेत. शिवाय काही नवीन खेळ सामावून घेतले जात आहेत. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतून खूप काही शिकण्याची संधी गोव्याला मिळणार आहे. एकार्थी ती एक सुवर्णसंधी आहे.
गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बहाल केल्यास बराच कालावधी लोटला पण गोव्यात आवश्यक क्रीडा मैदाने उपलब्ध नव्हती. आयोजनाची तयारी देखील नव्हती. त्यामुळे आयोजन लांबणीवर पडत गेले. गोव्याने आयोजनासाठी थोडा कालावधी मागून घेतला व त्यानंतर काही मैदाने नव्याने तयार करण्यात आली व आता या स्पर्धा उत्साहात होत आहेत.
गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धां यशस्वी होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचे प्रयत्न सार्थकी लागलेले आहेत. कारण हे गेले काही दिवस प्रयत्नांची शिकस्त करीत होते. मैदानांचा आढावा घेणे, तांत्रिक बाजू भक्कम करणे इत्यादींवर त्यांचा भर होता. मध्यंतरी गोव्यातील काही क्रीडा संघटनांनी सरकारकडून देय रक्कम मिळत नसल्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. पण त्यानंतर सरकारने याची दखल घेत क्रीडा संघटनांना देय रक्कम दिली व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धां यशस्वी करण्याचे आवाहन सर्वांना केले. यानंतर खऱ्याअर्थानं क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला धार चढली.
गोव्यात होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतून गोव्यातील युवा खेळाडूंना खूप काही शिकण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी खेळाडू कशाप्रकारे मेहनत घेतात, त्यांचे प्रशिक्षण, व्यायाम, आहार तसेच अन्य सुविधा यावर कशाप्रकारे भर दिला जातो, याचा अभ्यास करण्याची संधीही मिळणार आहे. गोव्यात आज फुटबॉल व क्रिकेट हे दोन खेळ सोडल्यास उर्वरित खेळांकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहिले जात नाही मात्र फुटबॉल व क्रिकेटच्या पलीकडे अन्य खेळही आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊ शकतात, हे जाणून घेण्याची संधी गोव्यातील युवक-युवतींना लाभलेली आहे. ही संधी त्यांनी साधून भविष्यात क्रीडा क्षेत्रात झेप घेण्याकरीता आगेकुच करणे हेच त्यांच्यासाठी योग्यतेचे असेल, असे वाटते.
आज कोट्यावधी रुपये खर्चून सरकारने साधनसुविधा (मैदाने) उपलब्ध केलेली आहेत. त्याचा वापर भविष्यात गोव्यातील खेळाडूंना करण्याची संधी मिळणार आहे आणि तसे विधान क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले आहे. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यासाठी एक संधी असल्याचे मतही त्यांनी मांडले आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर गोव्यातील खेळाडू कशाप्रकारे क्रीडा मैदाने तसेच इतर सुविधांचा लाभ घेत आहेत, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. शाळा, हायस्कूल, कॉलेज तसेच विद्यापीठ पातळीवर खेळांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ किती महत्त्वाचा आहे, हे विद्यार्थ्यांना पटवून द्यावे लागणार आहे. शाळा, महाविद्यालये यांची भूमिका भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे.
गोव्यात रक्षाबंधन आणि सरस्वती पूजनाला विरोध करणारे काही शिक्षक निघाले. जर उद्या खेळांना विरोध करू लागले तर सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण केलेली मैदाने वापराविना वाया जाण्याची भीती नाकारली जात नाही. त्यासाठी सरकारनेदेखील याकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे.
गोव्यातील काही क्रीडा मैदानांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आलेले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर या मैदानांची दुरुस्ती करून ती खेळाडूंसाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी मैदाने आहेत पण त्यांचा म्हणावा तसा वापर होत नाही. या मैदानांचा खेळासाठी कशाप्रकारे वापर करता येईल, याचाही अभ्यास व्हायला पाहिजे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हे एक व्यासपीठ आहे. गोव्यातील खेळाडू या स्पर्धेत कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. गोव्यातील खेळाडूंना आपल्या खेळात सुधारणा घडवून आणण्याची एक सुवर्ण संधी लाभणार आहे. क्रीडा क्षेत्रात आपण कुठे कमी पडतो व नेमके काय केले पाहिजे, याचा अभ्यास करण्याची संधीसुद्धा गोव्यातील खेळाडूंना मिळणार आहे. उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी देखील प्रयत्न करावे लागणार आहेत, जेणेकरून आगामी काळात गोव्यातील खेळाडू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करू शकतील.
नवे खेळ आकर्षण
37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तयारीची पाहणी करताना नवे खेळ पेंचाक सिलाट, स्क्वे मार्शल आर्ट, रोल बॉल, परंपरागत लगोरी या खेळांची प्रात्यक्षिके शिष्टमंडळाने सोमवारी पाहिली व या खेळांची माहिती करून घेतली. उत्तर भारतात लोकप्रिय असलेला गटका हा खेळ तसेच अन्य काही खेळही राष्ट्रीय स्पर्धेतील नव्या खेळांच्या रांगेत असल्याची माहिती अमिताभ शर्मा यांनी दिली. लगोरी हा परंपरागत खेळ पण तो कालबाह्या होण्याच्या मार्गावर आहे. त्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्थान मिळाल्यास हा खेळा पुन्हा बहरू शकतो. त्याचबरोबर नवीन खेळ आत्मसात करण्याची संधी गोव्यातील खेळाडूंना उपलब्ध झालेली आहे. एकूणच गोव्यात होत असलेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यासाठी फलदायी ठरो, याच शुभेच्छा.
महेश कोनेकर








