वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंगळवारी येथे जे. एल. एन. स्टेडियममध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभाचे औचित्य साधून केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे मंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते तिसऱ्या ‘फिट इंडिया क्वीझ’चे उद्घाटन केले.

2023 च्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या समारंभाला दिल्लीतील विविध शालेय संस्थांमधील सुमारे 500 विद्यार्थी त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, अधिकारी त्याचप्रमाणे साई, एमवायएएसचे, राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खेलो इंडिया योजना अंतर्गत देशातील क्रीडा पायाभूत योजनांची माहिती असलेल्या पुस्तकाचे अनावरण केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी केले. त्याचप्रमाणे बुडापेस्ट येथे नुकत्याच झालेल्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय पुरुष रिले संघातील धावपटूंचा गौरव करण्यात आला. यापूर्वी फिट इंडिया क्विझ ही प्रश्नावली (क्वीझ) दोनवेळा आयोजित केली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद लाभला होता. क्रीडा क्षेत्रातील आणि तंदुरुस्ती याच्यावर ही क्वीझ आयोजित केली असून शालेय विद्यार्थ्यांसाठी ती उपलब्ध करून देण्यात आली. या क्वीझमध्ये एकूण बक्षीसाची रक्कम 3.25 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
भारताचे हॉकी सम्राट दि. मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1928, 1932 आणि 1936 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग तीनवेळा हॉकीचे सुवर्णपदक पटकावले होते.









