चांद्रयान-3 यशाच्या पार्श्वभूमीवर सरकारची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानिमित्त दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ साजरा करण्याची घोषणा केली आहे. यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरची लँडिंग आणि प्रज्ञान रोव्हर उतरल्यावर 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी ठरली. चंद्रावर लँडिंग करण्याची कामगिरी करणाऱ्या निवडक देशांच्या गटात यामुळे भारत सामील झाला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक मोहिमेचे निष्कर्ष आगामी काळात मानवतेला लाभ मिळवून देणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
23 ऑगस्ट 2023 हा दिवस अंतराळ मोहिमेतील देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. यामुळे अंतराळ क्षेत्र संशोधनाला प्रोत्साहन मिळणार आहे. युवा या क्षेत्रात सामील होण्यासाठी प्रोत्साहित होतील. याचमुळे सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिसूचनेत म्हटले गेले आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर सॉफ्ट लँडिंग करणारी पहिली मोहीम ठरत चांद्रयान-3 ने इतिहास रचला होता. भारत आता अमेरिका, रशिया आणि चीनसोबत चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग करणाऱ्या काही निवडक देशांमध्ये सामील झाला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर प्रज्ञान आणि रोव्हरने एका चांद्रदिनापर्यंत सातत्याने काम केले होते. यादरम्यान त्यांच्याकडून चंद्राच्या पृष्ठभागावरून अनेक महत्त्वाची माहिती पाठविण्यात आली होती.









