भाजप नेत्यांचा आरोप, प्रश्नांसाठी लाच प्रकरणाचे दुबई कनेक्शन
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार महुवा मोईत्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अदानी उद्योगसमूहाला अडचणीत आणण्यासाठी त्यांनी अन्य उद्योगसमूहाकडून लाच घेतली असल्याचा आरोप होत आहे. अदानी समूहाविषयी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी हिरानंदानी समूहाकडून महागड्या वस्तू भेट म्हणून घेतल्या, असा हा आरोप असून हे प्रकरण आता संसदीय समितीकडे देण्यात आले आहे. त्यातच आता या प्रकरणाचे दुबई कनेक्शन उघड झाल्याने तो आणखी चर्चेचा विषय झाल्याचे दिसत आहे.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संसदेच्या वतीने खासदारांना दिल्या जाणाऱ्या लॅपटॉपचा पासवर्ड कोणालाही सांगण्यास नियमानुसार बंदी आहे. तथापि, मोईत्रा यांनी हा नियम मोडला असून त्यांचा लॅपटॉप दुबईहून कार्यरत असल्याचे दुबे यांचे म्हणणे आहे. जो लॅपटॉप खासदाराच्या स्वत:च्या उपयोगासाठी आहे, त्याचा पासवर्ड दुबईत कसा पोहचला आणि तेथून हा लॅपटॉप कसा कार्यरत करण्यात आला, असा प्रश्न करत मोईत्रा यांनी देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
देशापेक्षा लाच महत्वाची
मोईत्रा यांनी आपला पासवर्ड दुबईत कोणाला दिला याची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संसदेचा आयडी दुबईत कसा खोलला गेला, मोईत्रा यांनी कोणती संवेदनशील माहिती परदेशी नेली, ती का नेली आणि तिचा उपयोग कोणाकडून कसा करण्यात आला, असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. मोईत्रा यांना देशाच्या सुरक्षेपेक्षा स्वत:ला मिळणारी लाच महत्वाची वाटते. याच लाचेपोटी त्यांनी अदानी उद्योगसमूहाच्या विरोधात संसदेत प्रश्न विचारले आहेत. त्यांची सखोल चौकशी करा, अशी मागणी दुबे यांनी केली आहे.
सर्व संसदेकडून उपयोग
याच आयडीचा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संसदेतील सर्व खासदार करतात. हा आयडी फुटल्यामुळे त्यांच्या लॅपटॉपमधील माहितीही विदेशी पोहचली असल्याची शक्यता आहे. मोईत्रा यांनी केलेला हा गुप्ततेच्या शपथेचा गंभीर भंग असून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.