वृत्तसंस्था/ इंदोर
येथे राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा 19 ते 21 डिसेंबर दरम्यान भरविली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद इंदोरला मिळाले असून विजेत्यांसाठी एकूण बक्षिसाची रक्कम 10 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सदर माहिती अखिल भारतीय पिकलबॉल फेडरेशनचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भविष्यकाळात पिकलबॉल हा क्रीडाप्रकार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये राहण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतही या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. इंदोरमध्ये होणाऱ्या या आगामी राष्ट्रीय पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा पुरुष आणि महिलांच्या विभागात तसेच विविध वयोगटात घेतली जाणार आहे. या स्पर्धेत किमान 400 स्पर्धक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.









