चिपळूण :
तालुक्यातील गांग्रई येथील पुष्कर कृषी पर्यटन केंद्रात ६ ते १३ ऑगस्ट रोजी कला पुष्कर राज रंगलेखा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत देशातील सुमारे ४५ स्त्री-पुरुष चित्रकार, कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामुळे निसर्गाच्या सहवासात कलाकारांची मांदियाळी रंगतदार ठरणार आहे.
या कार्यशाळेत पंजाब, चेन्नई, नागपूर, नाशिक, पुणे, कोकण विभागातील मुंबई, कोल्हापूर, नवी मुंबई येथील भगवान चव्हाण, दत्तात्रय पाडेकर, आशुतोष आपटे, डी. एस. राणे, नीलेश शिळकर, जावेद मुलानी, श्वेता उरणे, नीलेश शहरकर, डॉ. सौम्या सुरेशकुमार, विष्णु परीट, दर्शन महाजन, चेतन गंगावणे, प्रवीण मिसाळ, बुद्धभूषण सपकाळे, प्रवीण उटगी, मकरंद राणे हे ६ ते ९ ऑगस्ट, तर अब्दुल गफार, विवेक लाड, बालाजी भांगे, शिवाजी म्हस्के, संपत नायकवडी, चंद्रकांत प्रजापती, भावेश पटेल, अजेय दळवी, राजेंद्रकुमार हंकारे, संदेश मोरे, राजेंद्र महाजन, राखी अरदकर, अर्पिता पवार, रचना नगरकर, अंकिता अस्वले, आकाश सूर्यवंशी, प्रणय फराटे, अनुजा कानिटकर, जनार्दन खोत हे १० ते १३ ऑगस्ट रोजी सहभागी होणार आहेत.
हे सर्वजण कलाकृती साकारणार आहेत. या कार्यशाळेच्या समाप्तीनंतर निवडक कलाकृतीचे प्रदर्शन मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलादालनात जानेवारी २०२६मध्ये भरवण्यात येणार आहे. या कलाप्रदर्शनातून होणाऱ्या विक्रीतून काही रक्कम रत्नागिरी जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून देण्यात येणार आहे. कलाप्रदर्शनाच्या निमित्ताने सर्व कलाकाराची थोडक्यात माहिती व एक चित्र असलेला छोटासा कॅटलॉगही प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कोकणालील निसर्गाच्या सानिध्यात ही कलाकारांची मांदियाळी सर्वानाच प्रेरणादायक ठरणार आहे. कलाकारांना, कला रसिकांना, कला विद्यार्थ्यांना एका वेगळ्याच आनंदायक अनुभवाची अनुभूती देणार आहे. त्यामुळे या कार्यशाळेच्या कालावधीत सर्वांनी गांग्रई येथे उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन कार्यशाळेचे आयोजक कोकणातील ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार, प्रा. प्रकाश राजेशिर्के, पुष्कर चव्हाण यांनी केले आहे.
- कला मेळावा…
दिग्गजांच्या कलाकृती अनुभवण्याची संधी
कार्यशाळेतील कलाकृतींचे मुंबईमध्ये प्रदर्शन
- गांग्रईचा निसर्ग कॅनव्हासवर
कार्यशाळेत सहभागी होणारे नामांकित चित्रकार आपल्या कलाकृती रेखाटणार आहेत. यातील काही चित्रकार गांग्रई गावाला लाभलेले व सर्वांना भुरळ पाडणारे निसर्ग सौंदर्य कागदावर उतरवणार आहेत. तसेच या कार्यशाळेत नवख्या चित्रकारांनाही काही दिवस सहभागी करुन घेतले जाणार आहे. त्यामुळे त्यांनाही मोठ्या चित्रकारांच्या अनुभवाचा काहीअंशी फायदा होणार असल्याने ही कार्यशाळा महत्वाची ठरणार आहे.








