तृतीय क्रमांकाचे मानकरी
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्याकडून सरपंच लताबाई बाबुराव कांबळे यांचा सन्मान
कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पंचायत पुरस्काराच्या तृतीय क्रमांकाचा मान आलाबाद (ता. कागल) ग्रामपंचायतीला मिळाला आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने 17 ते 21 एप्रिलपर्यंत ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह‘ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते आलाबादच्या सरपंच लताबाई बाबुराव कांबळे यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील, विभागाचे सचिव सुनील कुमार, कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे, आलाबादचे ग्रामसेवक अनिकेत पाटील उपस्थित होते.
आलाबाद या ग्रामपंचायतीला महिला अनुकूल पंचायत या श्रेणीतील तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. गावची लोकसंख्या 1883 असून महिलांची संख्या 848 असून ती 50 टक्केपेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायत आलाबादने महिला सक्षमीकरण आणि बाल विकासावर काम केले. शाळाबाह्य मुली, कमी वजनाच्या मुली आणि अशक्त मुली आणि महिला यावर ग्रामपंचायतने विशेष भर दिला. महिला सभेच्या वेळी ग्रामपंचायत महिलांना एकत्र करण्यासाठी छोट्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते. ग्रामपंचायतींमध्ये लसीकरण मोहिमेसाठी किंवा आरोग्य तपासणीसाठी महिलांना एकत्र करणे अवघड होते. अशावेळी आशा सेविका, एएनएम, अंगवाडी सेविका यांच्या मदतीने महिलांना त्यांच्या घरी लसीकरण करून त्यांना योग्य उपचार दिले जातात. गावाला महिला-स्नेही पंचायत बनवणे. यासाठी महिला आणि मुलींच्या प्रत्येक कामाची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने समित्या स्थापन केल्या आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि प्रेरिका ताई नोंदी घेत असतात आणि गरोदर/स्तनपान करण्राया, मुलगी आणि सर्व महिलांच्या समस्या सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. या कामाची दखल घेऊनच राष्ट्रीय स्तरावर ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला आहे.









