सिनेटर श्री ठाणेदार यांचा संसदेत प्रस्ताव : सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशांसाठी जल्लोषाचा दिवस
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत लवकरच भारताचा स्वातंत्र्यदिन राष्ट्रीय जल्लोषाच्या स्वरुपात साजरा केला जाण्यास सुरुवात होऊ शकते. देशाच्या संसदेत यासंबंधी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. ठाणेदार हे मूळचे बेळगावचे आहेत.

ठाणेदार यांनी प्रस्तावात भारताच्या स्वातंत्र्य दिनाला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवादी देशांचा ‘नॅशनल डे ऑफ सेलिब्रेशन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या विधेयकाला भारत आणि अमेरिकेमधील मजबूत भागीदारी ठरविण्यात आले असून ती दोन्ही देशांच्या लोकशाहीवादी मूल्यांवर निर्भर आहे. ही भागीदारी उर्वरित देशांमध्येही लोकशाहीची भावना, शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यास मदत करणार आहे. या प्रस्तावाला खासदार बडी कार्टर आणि ब्रॅड शर्मन यांनीही पुरस्कृत केले आहे.
मोदींच्या दौऱ्यामुळे भागिदारी बळकट
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी दोन्ही देशांचे संयुक्त हितसंबंध, स्वातंत्र्य, लोकशाही, कायद्याचे राज्य, मानवाधिकाराच्या सन्मानासाठीच्या प्रतिबद्धतेच्या आधारावर विश्वासाला पुढे नेले असल्याचे प्रस्तावात म्हटले गेले आहे.
अमेरिकेत महत्त्वाच्या पदांवर भारतीय
अमेरिकेत राहत असलेले भारतीय वंशाचे नागरिक विविध पदांवर काम करत आहेत. यात शासकीय अधिकारी, सैनिक अणि कायदा विभागाचे अधिकारी सामील आहेत. अमेरिकेला उत्तम ठिकाण ठरविण्यास आणि अमेरिकेच्या तत्त्वांना जगभरात पोहोचविण्यास हे लोक मदत करत आहेत. याचमुळे भारताचा स्वातंत्र्यदिन अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसोबत साजरा करणे आवश्यक आहे यामुळे दोन्ही देश अशा लोकशाहीवादी मूल्यांना आणखी दृढपणे लागू करू शकतात असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
दिवाळीच्या सुटीसाठी प्रस्ताव
यापूर्वी अमेरिकेत 25 मे रोजी प्रतिनिधिगृहात खासदार ग्रेस मेंग यांनी दिवाळीनिमित्त शासकीय सुटी घोषित करण्याची मागणी केली होती. याकरता त्यांनी संसदेत एक विधेयकही सादर केले होते. या विधेयकाला ‘दिवाली डे अॅक्ट’ नाव देण्यात आले आहे. विधेयकाच्या अंतर्गत दिवाळीनिमित्त अमेरिकेत 12 वी शासकीय सुटी घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. तर न्यूयॉर्कमध्ये दिवाळीसाठी शाळांमध्ये सुटीची घोषणा करण्यात आली आहे. सुमारे महिन्यापूर्वी राज्याच्या प्रतिनिधिगृहात याकरता विधेयक संमत झाले होते. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी याची घोषणा केली होती.
अमेरिकेत 44 लाख भारतीय वंशीय
जगभरात सुमारे 1.80 कोटी स्थलांतरित भारतीय आहेत. यातील 44 लाख भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत राहतात. अमेरिकेतील 6 प्रांतांमध्ये भारतीय वंशियांचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. कॅलिफोर्निया, टेक्सास, न्यू जर्सी, न्यूयॉर्क इलिनोइसमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे.









