पंतप्रधान मोदींचे नागरीसेवा दिनी प्रतिपादन ः राजकीय पक्षांच्या कामकाजावर लक्ष ठेवा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरी सेवा दिनी म्हणजेच शुक्रवारी अधिकाऱयांना महत्त्वाचा मंत्र दिला आहे. राजकीय पक्षांचे कामकाज आणि त्यांच्या निर्णयांवरून प्रश्न अवश्य विचारा असा आग्रह भारतातील प्रत्येक अधिकाऱयाला करू इच्छितो. सर्व अधिकाऱयांचे लक्ष्य देशहितच असायला हवे. असे म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे अधिकाऱयांना राजकीय पक्षांच्या कामकाजावर ‘तिसऱया डोळय़ा’च्या स्वरुपात नजर ठेवण्याचे आवाहन केले आहे. एखादा राजकीय पक्ष करदात्याचा पैसा कुठे खर्च करतोय हे अवश्य विचारले जावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
मागील वर्षी स्वातंत्र्यदिनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी मोहीम हाती घेण्याची पंतप्रधान मोदींनी केली होती. मोदींनी शुक्रवारी अधिकाऱयांना भ्रष्टाचारविरोधात कारवाई करण्याचा सल्ला देत यात राजकीय पक्षांनाही जोडले आहे. देशाचा प्रत्येक कर्मचारी मग तो राज्य सरकारचा असो किंवा केंद्र सरकारचा सर्वांवर देशाने मोठा भरवसा दाखविला आहे. तुम्हाला संधी मिळाली आहे. तुम्ही हा विश्वास कायम राखावा असे मोदींनी अधिकाऱयांना उद्देशून म्हटले आहे.
अधिकाऱयांनी स्वतःच्या सेवाकाळात केवळ देशहिताचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवेत. कुठल्याही क्षेत्रात एक व्यक्ती किंवा समुहासाठी निर्णय घ्यायची वेळ आल्यास या निर्णयाद्वारे देशाचे कल्याण होणार का असा विचार केला जावा. अधिकाऱयांसाठी देशहित हाच एकमेव मापदंड असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे.
कुठल्याही लोकशाहीत राजकीय पक्षांचे मोठे महत्त्व असते आणि हे अत्यंत आवश्यक देखील आहे. हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे. प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारसरणी असते, घटनेने प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे. परंतु अधिकारी अन् एक कर्मचारी म्हणून तुम्हाला प्रत्येक निर्णयात काही प्रश्नांची आता अवश्य खबरदारी घ्यावी लागणर आहे. सत्तेवर आलेला राजकीय पक्ष करदात्याचा पैसा देशहितासाठी वापरत आहे की नाही हे पाहिले जावे. तसेच देशाच्या संपत्तीची लूट तर होत नाही ना हे अधिकाऱयांनी पाहणे आवश्यक असल्याचे विधान मोदींनी केले आहे.
मतपेढीचे राजकारण
राजकीय पक्ष स्वतःच्या विस्तारासाठी शासकीय निधीचा वापर करत आहेत का यावर अधिकाऱयांनी लक्ष ठेवावे. राजकीय पक्ष स्वतःची मतपेढी निर्माण करण्यासाठी शासकीय निधीची लूट करत आहेत का सर्वसामान्यांचे जीवन सुलभ व्हावे म्हणून काम करत आहेत यावरही अधिकाऱयांची नजर असावी, असे आवाहन मोदींनी केले आहे.
काळय़ा कमाईचा मार्ग
राजकीय पक्ष स्वतःच्या नेत्यांच्या काळय़ा कमाईचा मार्ग निर्माण व्हावा म्हणून धोरणांमध्ये बदल करत आहेत का हे देखील अधिकाऱयांकडून तपासले जावे. स्वतःच्या प्रत्येक निर्णयाद्वारे अधिकाऱयाने देशहित साधले जातेय का हे पहावे. राजकीय पक्ष शासकीय निधीद्वारे स्वतःचा प्रचार करत आहेत का प्रामाणिकपणे लोकांना जागरुक करत आहेत यावर लक्ष ठेवले जावे. एखादा राजकीय पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच विविध संस्थांमध्ये नियुक्त करतोय का पारदर्शकपणे सर्वांना नोकरीची संधी देत आहे हे पाहिले जावे असे मोदींनी अधिकाऱयांना उद्देशून म्हटले आहे.
चूक झाल्यास देशाची लूट
सरदार वल्लभभाई पटेल हे ब्युरोक्रेसीला स्टील प्रेम ऑफ इंडिया संबोधित करायचे, याच ब्युरोक्रेसीला सरदार पटेलांच्या अपेक्षांची पूर्तता करावी लागणार आहे. जर ब्युरोक्रेसीकडून चूक झाल्यास देशाच्या संपत्तीची लूट होणार आहे, करदात्याचा पैसा वाया जाणार आहे. तसेच देशाच्या तरुणाईच्या स्वप्नांना धक्का पोहोचणार असल्याचे मोदी म्हणाले.









