प्रतिनिधी /बेळगाव
वन खाते आणि वन खात्याच्या समितीच्यावतीने रविवारी जिल्हा वन खात्याच्या आवारात राष्ट्रीय वन हुतात्मा दिन पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश मुस्तफा हुसेन उपस्थित होते. सीसीएफ मंजुनाथ चव्हाण, डीएफओ अँथोनी मरियप्पा यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैऱया झाडून शहीद जवानांना मानवंदना दिली. यावेळी बोलताना जिल्हा न्यायाधीश मुस्तफा हुसेन म्हणाले, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वने महत्त्वाची आहेत. शुद्ध हवेपासून ते वन उपजापर्यंत विविधांगी माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी वने जोडली गेली आहेत. या वनांचे संरक्षण करणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सीसीएफ मंजुनाथ चव्हाण म्हणाले, झाडे आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वन खात्याबरोबर प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. वन संवर्धनासाठी प्राणांची आहुती देणाऱया जवानांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अनेकांनी वन संरक्षणासाठी आपला जीव गमावला आहे, याची आठवणदेखील त्यांनी करून दिली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही., आरएफओ विनय गौडर, सीएफओ मल्लिनाथ कुसनाळ यासह वन अधिकारी, वनसंरक्षक उपस्थित होते.









