वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022-23 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला 8 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून तब्बल 6 महिन्यांच्या कालावधीत विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये सुमारे 1500 सामने खेळवले जातील अशी माहिती भारतीय क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. या हंगामाला दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेने प्रारंभ होईल.
भारतीय क्रिकेट हंगामाला दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेने सुरुवात केली जाणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट हंगामाच्या वेळापत्रकामध्ये आता तब्बल 3 वर्षांनंतर पूर्वीप्रमाणे विभागीय स्तरावरील स्वरुपाची दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे पुनरागमन झाले आहे. त्याचप्रमाणे इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेचेही राष्ट्रीय क्रिकेट हंगामात पुनरागमन झाल्याची माहिती मंडळाचे सचिव जय शहा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा 8 ते 25 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार असून ती उत्तर, दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व आणि ईशान्य अशा सहा विभागामध्ये बाद पद्धतीने होणार आहे. गेल्या काही वर्षांच्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामामध्ये विभागीय पद्धत अवलंबण्यात आली नव्हती. त्यावेळी इंडिया रेड, इंडिया ब्ल्यु, आणि इंडिया ग्रीन या संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जात होती. पण आता नव्या विभागीय पद्धतीनुसार या स्पर्धेत आता अतिरिक्त ईशान्य विभागाची भर पडली असून पूर्वीचे 5 विभाग कायम राहणार आहेत. दुलीप करंडक स्पर्धेनंतर 2 महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातील. सय्यद मुस्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धा 11 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर, विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान होणार आहे. पांढऱया रंगाचा चेंडू वापरण्यात येणाऱया या 2 स्पर्धांमध्ये 38 संघांचा समावेश राहिल. हे संघ तीन गटांमध्ये विभागण्यात येतील. 8 संघांचा सहभाग असलेले 3 गट तर 7 संघांचा सहभाग असलेले 2 गट राहतील. 2022-23 च्या रणजी क्रिकेट हंगामाला 13 डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून 20 फेब्रुवारीला या स्पर्धेचा समारोप राहिल. रणजी स्पर्धा पूर्वीच्या स्वरुपात पुन्हा खेळवली जाणार असून इलाईट आणि प्लेट अशा 2 विभागात संघांची विभागणी केली जाईल. इलाईट विभागात एकूण 32 संघांचा समावेश असून ते 4 गटात विभागले जातील. प्रत्येक संघ साखळी टप्प्यात 7 सामने खेळेल. 4 गटातील पहिले 2 संघ उपात्यंपूर्व फेरीसाठी थेट पात्र ठरतील. प्लेट विभागामध्ये 6 संघांचा समावेश असून ते 15 सामने साखळी गटात खेळतील. आघाडीचे 4 संघ उपांत्यफेरीसाठी थेट पात्र ठरतील. तर तळातील 2 संघ प्लेट विभागात परस्पराविरुद्ध सामने पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी खेळतील. इलाईट आणि प्लेट गटातील साखळी सामन्यांना 13 डिसेंबरपासून प्रारंभ होईल. प्लेट विभागातील साखळी सामने 29 जानेवारीला तर इलाईट विभागातील साखळी सामने 20 फेब्रुवारीला संपतील.
2023 च्या फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला अधिक सराव मिळणे जरुरीचे आहे. दरम्यान महिलांच्या क्रिकेट हंगामाला 11 ऑक्टोबरपासून वरिष्ठ महिलांच्या टी-20 करंडक क्रिकेट स्पर्धेने प्रारंभ होईल. ही स्पर्धा 5 नोव्हेंबरला संपणार आहे. या स्पर्धेनंतर वरिष्ठ महिलांची आंतरविभागीय टी-20 आणि टी-20 चॅलेंजर क्रिकेट स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. वरिष्ठ महिलांसाठी वनडे क्रिकेट स्पर्धा तसेच आंतरविभागीय वनडे क्रिकेट स्पर्धा घेतली जाणार आहे. 2022 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामामध्ये पहिल्यांदाच वरिष्ठ महिलांसाठी आंतरविभागीय टी-20 आणि वनडे क्रिकेट स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. 16 वर्षाखालील मुलींच्या गटासाठी वनडे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. 19 वर्षाखालील महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या जानेवारीत दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान महिलांची 19 वर्षाखाली वयोगटासाठी चॅलेंजर क्रिकेट स्पर्धा होणार आहे.
राष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक
वरिष्ठ पुरुष-8 ते 25 सप्टेंबर, दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा-1 ते 5 ऑक्टोबर-इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा, 11 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर-सय्यद मुस्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धा, 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर-विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धा.
वरिष्ठ महिला-11 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर-राष्ट्रीय टी-20 क्रिकेट स्पर्धा, 8 ते 15 नोव्हेंबर-आंतरविभागीय टी-20 स्पर्धा, 20 ते 26 नोव्हेंबर – चॅलेंजर टी-20 स्पर्धा, 18 जानेवारी ते 7 फेब्रुवारी-राष्ट्रीय वनडे क्रिकेट स्पर्धा, 12 ते 21 फेब्रुवारी-आंतरविभागीय वनडे क्रिकेट स्पर्धा.









