भोगावती, प्रतिनिधी
येळवडे ता. राधानगरी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात करवीरचे आमदार व भोगावती साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पी.एन. पाटील सडोलीकर गटाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शेकापक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.राज्याचे सहचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या हस्ते लाल स्कार्फ गळ्यात अडवून घेतलेले राशिवडे खुर्द गावचे हे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे संपूर्ण भोगावती साखर कारखाना परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
भोगावती कारखाना परिसर व करवीर विधानसभा मतदारसंघातून आमदार पी एन.पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे बियाणे शिल्लक ठेवणार नसल्याची जाहीर भाषा करीत होते.काही प्रमाणात तसे यशस्वी प्रयत्नही झाले आहेत.मात्र आजचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षातील प्रवेश त्यांना भविष्यात अंतर्मुख करायला लावणारा ठरणार आहे.विशेष म्हणजे आमदार पाटील यांचे जेष्ठ सहकारी,भोगावतीचे विद्यमान संचालक व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर (बापू) यांच्याच कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केल्याने राधानगरी तालुक्यातील काँग्रेस मधील नाराजीला तोंड फुटले आहे.
शेकापक्षात प्रवेश केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पांडुरंग किरुळकर, सुरेश पाटील, तानाजी पाटील, रंगराव पाटील, संदीप पाटील, दिपक पाटील, कृष्णा पाटील,मधुकर सुतार आदीसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचा पट्टा काढून शेतकरी कामगार पक्षाचा स्कार्फ घालून लाल सलाम स्विकारला आहे.