वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या उपकनिष्ठांची राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धा ग्रेटर नोयडामध्ये 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान आयोजित केली आहे. सदर स्पर्धा 15 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या विभागात घेतली जाणार असून यामध्ये सुमारे 700 स्पर्धक सहभागी होत आहेत.
उपकनिष्ठांची ही स्पर्धा 15 विविध वजन गटामध्ये घेतली जाणार आहे. चालु वर्षाच्या प्रारंभी पुरुष, महिलांची तसेच कनिष्ठांची राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धा यशस्वीपणे भरविली गेली होती. उपकनिष्ठांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत मुलांच्या विभागात चंदीगड तर मुलींच्या विभागात हरियाणा हे विद्यमान विजेते आहेत. या स्पर्धेमध्ये नव्याने 10 गुणांची पद्धत पहिल्यांदाच अंमलात आणली जाणार आहे. अलिकडेच झालेल्या 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटातील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या मुष्टीयोद्ध्यांनी दर्जेदार कामगिरी करताना 43 पदकांची कमाई करत दुसरे स्थान मिळविले.









