सुनीला सोवनी : अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी धार्मिक कार्याबरोबरच राष्ट्रजागृती करण्याचे विशाल काम केले आहे. आजचे काशीमधील विश्वनाथ मंदिर हे अहिल्यादेवी निर्मित आहे. त्यांनी शेकडो मंदिरांच्या निर्मितीचे काम केले आहे. इतकेच नव्हे तर पर्यावरण, पशु, पक्षी, मंदिरे, देव यासाठी कार्य केले आहे, असे मत अखिल भारतीय प्रसार, प्रचार प्रमुख, राष्ट्रसेविका समितीच्या सुनीला सोवनी यांनी व्यक्त केले.
उन्नती ट्रस्ट, राष्ट्रसेविका समिती आणि सामाजिक समरसता मंच बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 29 रोजी के. के. वेणुगोपाल सभागृह हिंदवाडी येथे अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून सुनीला सोवनी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर बुचडी होते. सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर आणि अखंड भारतमातेच्या फोटोचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महापौर सविता कांबळे यांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सुनीला सोवनी पुढे म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक कार्ये केली आहेत. त्यांचे वैयक्तिक जीवन कठीण होते, पण कर्तृत्व मोठे होते. त्यांची 300 वी जयंती सुरू आहे. 900 मंदिरांच्या निर्मितीसाठी त्यांनी कार्य केले आहे. लोकांसाठीही समाजाभिमुख कार्य केले असून त्यांचे लहानपणीच पेशव्यांच्या घराण्यात लग्न झाले. पतीचे निधनानंतर त्यांच्या इतर 11 पत्नी सती जात होत्या. पण अहिल्यादेवी यांनी मी सती जाणार नाही, असा निश्चय केला. अशाप्रकारे त्यांच्या जीवनपटावर सुनीला सोवनी यांनी प्रकाश टाकला. यावेळी व्यासपीठावर इतर मान्यवर उपस्थित होते.









