पुणे येथे राष्ट्रीय कला प्रदर्शन व स्पर्धा संपन्न
ओटवणे / प्रतिनिधी: कला महर्षी बाबुराव पेंटर आर्ट फाउंडेशन तर्फे आयोजित राष्ट्रीय कला प्रदर्शन व स्पर्धेत निसर्ग विभागात माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक सिद्धेश सुधाकर कानसे यांनी रेखाटलेल्या निसर्गचित्राला प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासह राष्ट्रीय कला पुरस्कार प्राप्त झाला आहे.
हे राष्ट्रीय कला प्रदर्शन पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व कलादालनात २ जून ते ४ जून असे तीन दिवस भरविण्यात आले होते. या राष्ट्रीय कला प्रदर्शनात देशभरातील विविध कलावंतांच्या एकूण ५०० कलाकृतींचा समावेश होता. या प्रदर्शनात निसर्गचित्र, व्यक्तीचित्र, रचनाचित्र या विभागांचा समावेश होता. या राष्ट्रीय कला प्रदर्शन व स्पर्धेसाठी सिद्धेश कानसे यांनी साकारलेल्या निसर्गचित्राची निवड करण्यात आली होती. या प्रदर्शनातील सिद्धेश कानसे यांच्या निसर्ग चित्राचे देशभरातील कला क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी कौतुक केले.
.या राष्ट्रीय कला प्रदर्शन व स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण प्रसंगी सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर, चित्रकार संजय शेलार, चित्रकार विजयमाला पेंटर, चित्रकार आशालता पेंटर, अनुराधा मेस्त्री, चित्रकार सुरेश लोणकर, अर्जुन मेस्त्री आदी कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिद्धेश कानसे यांना सुप्रसिद्ध चित्रकार विजयमाला पेंटर यांच्याहस्ते प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासह राष्ट्रीय कला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कला प्रदर्शन व स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर आणि चित्रकार संजय शेलार यांनी केले.
या राष्ट्रीय कला प्रदर्शन व स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासह राष्ट्रीय कला पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सिद्धेश कानसे यांचे माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, सचिव सीए लक्ष्मण नाईक, उपाध्यक्ष नारायण कानसे, मुख्याध्यापिका शुभांगी चव्हाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कानसे परिवार आणि जिल्ह्यातील कला क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.