प्रतिनिधी/ रत्नागिरी
आजोबा आणि वडील दोघेही उत्कृष्ट चित्रकार.याच दोघांच्या कुशीत वाढत असताना कलेचे बाळकडू त्यालाही लाभले.चित्रकला, हस्तकला, मूर्तीकलेची आवड आपोआप निर्माण झाली. रत्नागिरी शहरानजीकच्या भाटय़े येथील तरूण चित्रकार अक्षय पिलणकरने केंद्रीय नारळ बोर्डाचा ‘सर्वोत्तम कलाकृती’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.
अक्षय हा भाटय़े येथील प्रसिद्ध गणेशमूर्तीकार कै.परमानंद पिलणकर यांचा मुलगा. कै.पिलणकर यांनाही 2010 साली केंद्रीय नारळ बोर्डाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. घरातच विविध कलांचे बाळकडू मिळालेल्या अक्षयने शालेय व महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांमधून अनेक पुरस्कार मिळविले. आजोबा व वडिलांचा अखंड नारळावर विविध कलाकृती कोरण्याचा वारसा अक्षयनेही जपला आहे.
केरळ-कोची येथील केंद्रीय नारळ विकास मंडळाच्या स्पर्धेत अक्षयने नारळावर कोरलेली गणपतीपुळे येथील श्री गणेशाची मूर्ती देशात सर्वोत्कृष्ट ठरली. जागतिक नारळदिनी 2 सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोची येथे होणाऱया पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण अक्षयला देण्यात आले आहे.
अक्षयने आपल्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या श्रीगणेशाच्या कलाकृतींची भुरळ राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार यांनाही पडली आहे. त्याच्या कारखान्यातील देखण्या गणेशमूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहेत.









