‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांकडून कलेवर प्रकाशझोत
पणजी : गोव्यातील प्रसिद्ध कावी चित्रकार सागर नाईक मुळे यांच्या कलेचा देशपातळीवर गौरव झालेला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. केंद्रीय कला आणि संस्कृती मंत्रालयाच्या ‘अमर चित्र कथा’ पुस्तकात कावी चित्रकार सागर नाईक मुळे यांच्या चित्राचा समावेश झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात तशी माहिती दिल्याने हा गोवा राज्याचा एकप्रकारे बहुमानच ठरलेला आहे.
फोंडा तालुक्यातील आडपई हा कलाकारांचा गाव. या ठिकाणच्या कलाकारांनी आपली कलेची परंपरा वर्षानुवर्षे टिकवून ठेवली आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून मिळालेला कलेचा वारसा आणि त्याचे जतन यामुळे आजचे युवा कलाकारही या ठिकाणी आपल्या कलेला वाव देताना दिसत आहेत. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आडपई येथील कावी चित्रकार सागर नाईक मुळे हे होत. त्यांचा देशपातळीवर बहुमान झाल्याने त्यांचे आडपई गावात कौतुक होत आहे.
कावी चित्रकला हळूहळू लोप पावत चालली असतानाच 2020 मध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात कावी कलेला सुरवात केलेले सागर नाईक मुळे हे आता या कलेच्या प्रसारासाठी आणि जतनासाठी आपले योगदान देत आहेत. सध्याच्या आधुनिक युगात गोमंतकीयांना या कलेचा विसर पडत चालला आहे. अशा स्थितीत सागर नाईक मुळे अनेक वर्षांपासून या कलेची पूजा करताना दिसत आहेत. नवरात्रोत्सवकाळातच त्यांना केंद्रीय कला आणि संस्कृती मंत्रालयाच्या ‘अमर चित्र कथा’ पुस्तकात आपल्या चित्राचा समावेश झालेला आहे, असे कळताच कावी चित्रकार सागर नाईक मुळे यांनी देवाचे आभार मानले आहेत. गोमंतकीयांमध्ये कावी या कलेबाबत वारंवार जागृती करण्यासाठी सागर नाईक मुळे हे झटताना दिसत आहेत.
पंतप्रधानांकडून कावी चित्रांचा संदर्भ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून आतापर्यंत ज्या कलाकारांच्या कलेचा आढावा घेतलेला आहे, अशा कलाकारांसंदर्भातील माहिती देणारी पुस्तके कला आणि संस्कृती मंत्रालय प्रकाशित करत असते. मे 2023 या महिन्यात मोदींनी गोव्यातील कावी चित्रकार सागर नाईक मुळे यांच्या कावी चित्रांचा संदर्भ देत या कलेचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे आवाहन केलेले होते. त्यामुळे कला आणि संस्कृती मंत्रालयाने पाचव्या भागातील पुस्तकात सागर नाईक मुळे यांचा समावेश केलेला असून, त्यांच्या कलेची माहिती पुस्तकातून जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकात पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या देशभरातील 11 जणांचा आढावा घेण्यात आला असून, त्यात सागर नाईक मुळे यांचा समावेश असल्याने गोव्यासाठी ही निश्चित अभिमानाची बाब ठरली आहे.









