ध्वजही बदलण्याची जमाते इस्लामीची मागणी
वृत्तसंस्था / ढाका
बांगला देशमध्ये शेख हसीना यांच्या पलायनानंतर अनागोंदी माजली असून जमाते इस्लामी ही कट्टर धर्मांध संघटना डोके वर काढू लागली आहे. आता या संघटनेने बांगला देशाचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज बदलण्यासाठी दबाव आणण्यास सुरवात केली आहे. बांगला देशाचे सध्याचे राष्ट्रगीत हे भारताचे आमच्या देशावर थोपविलेले आहे. त्यामुळे ते बदलणे आवश्यक आहे, असे या संघटनेचे म्हणणे आहे. तथापि, या देशाच्या अंतरिम सरकारने ही मागणी सध्यातरी नाकारली आहे.
बांगला देशात शेख हसीना यांच्या सरकारचे पतन झाल्यानंतर सर्वपक्षीय अंतरिम सरकार अस्तित्वात आले आहे. या सरकारमध्ये जमाते इस्लामी या धर्मांध संघटनेचाही सहभाग आहे. अर्थतज्ञ मोहम्मद युनूस हे या सरकारचे प्रमुख सल्लागार आहेत. जमाते इस्लामी या संघटनेने आता आपले खरे स्वरुप उघड करण्यास प्रारंभ केला असून अंतरिम सरकारम या संघटनेच्या कट्टर धार्मिक कार्यक्रमावर कसे आणि किती प्रमाणात नियंत्रण ठेवू शकते, यावर बांगला देशचे भवितव्य ठरेल, असे मत अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रगीतावरुन वाद
बांगला देशचे सध्याचे राष्ट्रगीत हे एका स्वतंत्र देशाचे राष्ट्रगीत वाटत नाही, असा साळसूद मुद्दा जमाते इस्लामीचे माजी प्रमुख गुलाम आझमी यांचा पुत्र अब्दुल्लाहिल अमान आझमी याने उपस्थित केला आहे. सध्याचे राष्ट्रगीत ही भारताची देणगी आहे. हे राष्ट्रगीत 1971 नंतरच्या बांगला देशचे नसून ते ब्रिटीशांनी केलेली बंगालची फाळणी आणि नंतर पुन्हा ती रद्द करण्याचा निर्णय याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे ते सध्याच्या बांगला देशला लागू पडत नाही, असा जमाते इस्लामीचा दावा आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
नव्या आयोगाची मागणी
बांगला देशच्या अंतरिम सरकारने नवा आयोग स्थापन करावा आणि देशासाठी नवे राष्ट्रगीत आणि नवा राष्ट्रध्वज निवडावा, अशी सूचना या संघटनेने केली आहे. काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनीही या मागणीचे समर्थन केल्याने ती अधिक जोरदारपणे केली जाऊ लागली आहे. बांगला देशच्या सोशल मिडियावरुनही या मागणीला पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या नकार, पण…
बांगला देशच्या अंतरिम सरकारने या दोन्ही मागण्या सध्या फेटाळल्या आहेत. तथापि, जमाते इस्लामीचा दबाव वाढला तर भविष्यकाळात हा नकार कायम राहील, याची शाश्वती नाही. तसेच काही महिन्यांच्या नंतर बांगला देशात सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली, तर त्या निवडणुकीत हा मुद्दा प्रकर्षाने मांडला जाऊ शकतो असे काही तज्ञांचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा महत्वाचा बनण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे दिसून येते.
वाटचाल धर्मवादाच्या दिशेने ?
बांगला देशातील सध्याच्या अराजकाच्या स्थितीचा लाभ उठविण्याच्या प्रयत्नात तेथील कट्टर धर्मवादी संघटना आहेत. त्यांचे बळ वाढल्यास या देशाची वाटचाल धर्मवादाच्या दिशेने होऊ शकते. तेथे धार्मिक कट्टरता वाढल्यास तेथील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या अस्तित्वासाठी तो मोठाच धोका ठरु शकतो. तसेच भारताच्या सुरक्षेवरही याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. भारताने या शक्यता लक्षात घेऊन आपली सज्जता ठेवणे आवश्यक आहे, असेही तज्ञांचे मत आहे.









