जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : शहापूर खडेबाजार येथील रस्ता रुंदीकरण करताना काही दुकानदारांना नाथ पै सर्कल येथे स्थलांतरित करण्यात आले. मात्र या दुकानदारांना महानगरपालिकेच्या महसूल विभागाकडून अद्याप टॅक्स चलन म्हणजेच कर पावती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. 2009 पासून ही पावती देणे बंद झाले असल्याने आमची गैरसोय होत आहे. चलन भरले नाही म्हणून आमच्यावर कारवाई केली जाईल, अशी चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे हे चलन लवकरात लवकर द्यावे, अशा मागणीचे निवेदन येथील दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सीडीपी अंतर्गत 1996 मध्ये रस्ता रुंदीकरण करण्यात आले. यावेळी जागा गेलेल्या दुकानदारांना नाथ पै सर्कल रोड येथे रस्त्याशेजारी जागा देण्यात आली. आम्ही महापालिकेच्या मंजुरीनंतर स्वखर्चाने पक्की दुकाने बांधून घेऊन कर देण्यास सुरुवात केली. तथापि 2009 पासून आम्हाला चलन देण्यात आलेले नाही. 2021 मध्ये आम्ही ही बाब महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु अद्याप त्यावर कोणतेही उत्तर मिळाले नाही. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून आम्हाला त्वरित चलन देण्याची व्यवस्था करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर पी. डी. सपकाळ, एस. एम. रेडेकर यांच्यासह अन्य दुकानदारांच्या सह्या आहेत.









