अध्याय एकोणतिसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, ज्यांना मी तुला केलेल्या उपदेशात काय सांगितले आहे हे माहित नाही, ज्यांना शास्त्रार्थ, आश्रमधर्म, जप, होम, इत्यादि बद्दल काहीच माहिती नाही परंतु ज्यांना त्यांच्या जन्ममरणाचे निवारण व्हावे असे वाटते, ज्यांना संसारातून विरक्त व्हावे अशी इच्छा असते, असे लोक जर चित्त, वित्त, जीवित, ह्या सगळ्यासह सद्गुरुंना अनन्यशरण आलेले असतील तर त्यांना संपूर्ण निरपेक्षतेने ह्या ब्रह्मज्ञानाचा आवश्य उपदेश करावा. जेथे वैराग्य संपूर्ण नष्ट होते अशा पद्धतीच्या स्त्राrचा संग कदापि करू नये. अशी स्त्राr बघताच साधकाचे तत्काळ अध:पतन घडून येते. तिच्यापुढे ज्ञानी माणसाची धडगत लागत नाही. त्यामुळे तो परमार्थ करून भवसागर तरुन जाईल अशी शक्यताच उरत नाही. अशी स्त्राr शहाण्या माणसाकडे नुसता नेत्रकटाक्ष टाकून त्याला घायाळ करून टाकते. तेथे ह्या ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचा काय उपयोग? उद्धवा, अशा स्त्रियांची संगत ही सदैव निंद्य असते म्हणून त्यांच्या कदापि नादाला लागणार नाही असे वचन मला दे. तसेच अशा स्त्रियांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायच्या भानगडीत अजिबात पडू नकोस. हे ऐकल्यावर उद्धवाच्या मनात एक शंका आली. ती तो भगवंतांना विचारू लागला. तो म्हणाला, देवा, स्त्रियांना उपदेश करू नकोस असे तुम्ही आत्ता सांगितलेत. पण पूर्वीच्या काळी तर थोर थोर ज्ञानी स्त्रिया होऊन गेल्या. हे कसे शक्य झाले? उदाहरणेच द्यायची झाली तर कितीतरी देता येतील तरीपण नमुन्यादाखल दोनचार गोष्टींचा उल्लेख करतो. श्रेष्ठ याज्ञवल्क्य मुनींनी त्यांची पत्नी मैत्रेयी हिला उपनिषदांचा उपदेश केला. नारद महामुनींनी प्रल्हादाच्या आईची इंद्रापासून सुटका केली आणि नंतर तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. कपिलमुनींनी सिद्धासनी बसून देवहूतीला ब्रह्मज्ञानाचे प्रबोधन केले. योगियांचा मुकुटमणी असलेल्या कैलासपती शंकराने भवानीला ब्रह्मज्ञानाचा बोध केला. आता इतरांची गोष्ट कशाला बोलायची? हृषीकेशी तुम्ही स्वत: यज्ञपत्न्यांना उपदेश केला आहे. उद्धवच्या बोलण्याचा मतितार्थ भगवंतांना लगेच समजला. उद्धवाचा काहीतरी समजुतीचा घोटाळा झालेला आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांची झालेली गैरसमजूत काढून टाकावी म्हणून ते म्हणाले, तुझी शंका योग्य आहे. त्याबद्दलही सविस्तर सांगतो. ऐक, अरे उपदेश कुणाला करायचा तर ज्याचा अधिकार आहे त्याला हे तर तुला मान्य झाले आहे ना? आता ती अधिकारी स्त्राr कशी ओळखावी ते सांगतो. जी स्त्राr वाचाळ आहे, बडबडी आहे ती ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायला अनुचित आहे असे समज. तेथे उपदेश करणे व्यर्थ असते कारण त्यातून गुरुचाच घात होतो. ब्रह्मज्ञान हे गुप्तज्ञान आहे परंतु वाचाळ स्त्राrच्या तोंडातून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सहजी बोलल्या जातात. भगवंतांचे हे बोलणे नाथमहाराजांनाही पटले. त्यावर त्यांनी त्यांच्या सद्गुरुंना प्रश्न केला की, महाराज माझ्याकडे स्त्रिया पुरुष उपदेशासाठी येतात. उपदेश घेऊन आपणही भवसागर तरुन जावा अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी सद्गुरुंना शरण जाण्याशिवाय तरणोपाय नाही म्हणून मोठ्या आशेने ते माझ्याकडे येतात. त्यांची परिस्थिती बघितल्यावर त्यांच्यापैकी बऱ्याच जणांची उपदेश करण्याची पात्रता नसते पण त्यांना नाही म्हणून त्यांचं मन दुखवायचं माझ्या अगदी जीवावर येतं. त्यांना मी कसं समजावून सांगू जेणेकरून त्यांच्या अंगी ब्रह्मज्ञानाचा उपदेश घेण्याची पात्रता येईल ते कृपा करून मला सांगा. श्रीनाथमहाराजांचा प्रश्न ऐकून, त्यांच्या सद्गुरुना, श्रीजनार्दनस्वामींना मोठा आनंद झाला. आपला शिष्य सगळ्यांच्या बाबतीत कळवळा बाळगून आहे, त्या सगळ्यांचा उद्धार व्हावा अशी त्यांची मनापासून इच्छा आहे पण सर्वच काही त्यासाठी पात्र नसल्याने त्यांना त्यासाठी पात्र कसे करू म्हणून विचारत आहे हे त्यांच्या लक्षात आले.
क्रमश:








