ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सोमय्या सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. काल विधीमंडळातही या घटनेचे पडसाद उमटले होते. या सर्व प्रकारादरम्यान राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळी भूमिका घेत नाराजी व्यक्त केली होती. अशा प्रकारचे व्यक्तिगत हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे, या प्रकाराचा निषेध करतो, असे आव्हाडांनी म्हटले होते. आव्हाडांच्या या भूमिकेचे त्यांची मुलगी नताशाने कौतुक केले आहे. नताशाचे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नताशाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बाबा, जेव्हा तुम्ही कोविडमध्ये गंभीर आजारी होता, तेव्हा हेच किरीट सोमय्या तुम्ही आजारी नाहीतच, नाटक करत आहात असे खोटे आरोप करत होते. तसेच तुम्ही आजारी असल्याचा पुरावा मागत होते. तेव्हा आपल्या परिवाराने खूप मानसिक त्रास भोगला. तरीही आज किरीट सोमय्यांच्या खासगी आयुष्याच्या हक्कांसाठी तुम्ही उभे राहिलात, हे अभिमानास्पद आहे.”
बाबा,जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात,तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच,नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेंव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे! https://t.co/HGWmZunrRo
— Natasha Awhad (@NatashaASpeaks) July 18, 2023
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तिक हल्ले करून एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे या प्रकाराचा मी निषेध करतो. जेव्हा त्याचं वैयक्तिक जीवन तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू असला तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तिकरीत्या त्याच्यावर हल्ला करून त्याचे वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.
त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.








